खा. राऊत यांचा आरोप; आम्ही कुणीही चुकीचे काही केले नाही मुंबई / प्रतिनिधी : जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्टया संपवता येत नाही, तेव्हा ...
खा. राऊत यांचा आरोप; आम्ही कुणीही चुकीचे काही केले नाही
मुंबई / प्रतिनिधी : जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्टया संपवता येत नाही, तेव्हा त्यांना पोलिस, ईडी, सीबीआयसारखी हत्यारे वापरावी लागतात. राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर सुरु आहे; पण ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीच्या नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचे केलेले नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या चर्चेनंतर राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. इतकेच नाही, तर सरकार टिकू देऊ नका असे सांगत भाजपचे काही नेते धमकावत असल्याचा आरोप ही त्यांनी केला. ते म्हणाले, की जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा त्यांना पोलिस, ईडी, सीबीआयसारखी हत्यारे वापरावी लागतात. वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना नोटीस आली आहे. आता माझ्या नावाचाही गजर सुरू आहे.
घरातील महिलांना, कुटुंबीयांना लक्ष्य करणे ही नामर्दानगी आहे. या नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल. बायकांच्या पदाराआडची खेळी तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. ते म्हणाले, की वर्षा राऊत उद्या चौकशीला जाणार की नाही याबाबत अद्याप ठरवलेले नाही. ही राजकीय कारवाई आहे. त्यामुळे याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत.
ईडी नोटीससंदर्भात राऊत म्हणाले, की गेल्या दीड महिन्यांपासून ईडी आमच्याशी पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती हवी होती. त्यासंदर्भात सर्व कायदपत्रे आम्ही दिली आहेत; परंतु या पत्रव्यवहारात कोणत्याही चौकशीचा उल्लेख केलेला नाही. भाजपची माकडे कालपासून उड्या मारतायत, की पीएमसी बँक प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. याची माहिती भाजपला कशी मिळाली? ईडीने भाजपशी हातमिळवणी केली आहे का?
भाजपचे काही महत्त्वाचे लोक आणि त्यांचे हस्तक सातत्याने माझी भेट घेऊन हे सरकार टिकवू नका, हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी धमकवण्याचा प्रयत्न केला; पणी मी त्यांचा बाप आहे. त्यांनी अनेकांच्या नावाची यादी दाखवली. त्यांना केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे असे सांगण्यात आले. तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला अटक करा; पण या सरकार धक्काही लागू देणार नाही, असे राऊत म्हणाले.