पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकाच भाषणात विरोधकांबाबत वक्तव्य नवीदिल्लीः केंद्र सरकारने केलेले तीनही कायदे विरोधकांचे पापाचे फळ आहे, अशा शे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकाच भाषणात विरोधकांबाबत वक्तव्य
नवीदिल्लीः केंद्र सरकारने केलेले तीनही कायदे विरोधकांचे पापाचे फळ आहे, अशा शेलक्या शब्दांत विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तुटून पडले. दुसरीकडे उपोषण करणार्या शेतकर्यांच्या प्रश्नांतून मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असताना सहकार्य करण्याचे आवाहन करताना विरोधकांना हात जोडले.
मध्य प्रदेशमध्ये किसान महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. या वेळी ते म्हणाले, की मागील अनेक दिवसांपासून शेतकर्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांवर चर्चा सुरू आहे. कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारे हे कायदे एका रात्रीत तयार करण्यात आलेले नाहीत. मागील 20-22 वर्षांपासून सत्तेत असलेल्या प्रत्येक सरकारने यावर समग्रपणे चर्चा केली आहे. मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो, याचे सगळे श्रेय तुम्ही घ्या. याचे सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक जाहीरनाम्यांना देतो. मला शेतकर्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे,
देशातील सर्वच राजकीय पक्षांचे जुने जाहीरनामे बघितले. त्यांची जुनी भाषणे ऐकली. जे कृषी मंत्रालय सांभाळत होते, त्यांची पत्रे वाचली तर आज कृषी क्षेत्रात जे बदल करण्यात आले आहेत. ते वेगळे नाहीत. आमचे सरकार शेतकरी समर्पित असून, आम्ही फाईलींच्या ढिगार्यात फेकण्यात आलेल्या स्वामिनाथन आयोगाचा अहवाल बाहेर काढला आणि शिफारशी लागू केल्या. हमीभावात दीड टक्क्यांनी वाढ केली, असा दावा मोदी यांनी केला. या वेळी त्यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
तंत्रज्ञानातून शेतकर्यांना थेट लाभ
तंत्रज्ञानाच्या मदतीने आता शेतकर्यांना थेट लाभ मिळत आहेत. यापूर्वी शेतकर्यांना क्रेडिट कार्ड देण्यात येत नव्हते; परंतु आम्ही आता देशातील सर्व शेतकर्यांना शेतकरी क्रेडिट कार्ड देण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता शेतकर्यांना अधिक व्याजदरावर कर्ज घेण्यापासून मुक्ती मिळाली आहे. आमचा उद्देश देशात उत्तम साठवणूक साखळी तयार करण्यावर आहे. यासाठी आम्ही उद्योग जगतालाही पुढे येण्याचे अवाहन केले आहे, असे पंतप्रधान या वेळी म्हणाले.
शेतकर्यांची फसवणूक
विरोधकांनी शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मध्य प्रदेशात त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी निरनिराळी कारणे दिली. यानंतर राजस्थानमध्येही तेच केले. शेतकर्यांची अजून किती फसवणूक हे लोक करणार आहेत, असा सवाल मोदी यांनी केला. प्रत्येक निवडणुकांपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात येते. शेतकर्यांना पैसा मिळण्याऐवजी बँकांच्या नोटिसा नाहीतर अटकेचे वॉरंट मिळत होते, अशी टीका त्यांनी केली. हे लोक केवळ मोठ्या शेतकर्यांचे कर्ज माफ करतात. आमच्या कार्यकाळात शेतकरी सन्मान निधीच्या अंतर्गत पैसे थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. भ्रष्टाचाराची जुगलबंदी आम्ही बंद केली आहे, असे ते म्हणाले.