सातारा / प्रतिनिधी : बांधकामाची बिले काढण्यासाठी बनावट पॅनकार्ड बनवून धनादेश स्वत:च्या खात्यावर वटवून फसवणूक केल्याप्रकरणी कराड येथील दोघ...
सातारा / प्रतिनिधी : बांधकामाची बिले काढण्यासाठी बनावट पॅनकार्ड बनवून धनादेश स्वत:च्या खात्यावर वटवून फसवणूक केल्याप्रकरणी कराड येथील दोघांवर कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहीद मोमीन आणि विजय दबडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दीपक शंकरराव पाटील (रा. शास्त्रीनगर, मलकापूर, ता. कर्हाड) यांनी फिर्याद दिली आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची कृष्णा ऍग्रीकल्चर कॉलेज (जुळेवाडी, ता. कराड) येथील बांधकामाची बिले भैरवनाथ सहकारी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडे (शाखा कार्वे नाका, कराड) येथे असलेल्या कर्ज खात्यावर जमा होणे आवश्यक होते.
मात्र, ही बांधकामांची बिले जमा न होऊ देता संशयित शहीद मोमीन आणि विजय दबडे यांनी दीपक पाटील यांच्या समंतीशिवाय दीपक बिल्डर्स फर्मच्या नावाने बनावट पॅनकार्ड तयार केले. त्याच्या आधारे वाई अर्बन बँकेच्या मलकापूर शाखेत खाते उघडले. त्या बिलाचे धनादेश तेथे जमा केले. ते धनादेश वटल्यानंतर त्यातील रकमेचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला. ही बाब लक्षात आल्यानंतर दीपक पाटील यांनी याची तक्रार कर्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली. उपनिरीक्षक भापकर तपास करत आहेत.