नवी दिल्ली : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही या कोणताच तोडगा निघालेला नाही आंदोलनावर आज शेत...
नवी दिल्ली :
दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही या कोणताच तोडगा निघालेला नाही आंदोलनावर आज शेतकरी आणि केंद्र सरकार दरम्यान पुन्हा चर्चा होणार असून या चर्चेपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. मोदी सरकारचे असत्याचे प्रयोग सुरूच असून शेतकरी त्यावर विश्वास ठेवणार नाहीत, अशी टीका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
केंद्र सरकारने कृषी कायदा रद्द करावा म्हणून शेतकऱ्यांनी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींदरम्यान सहा वेळा बैठका झाला. या सहाही बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे आज सातव्यांदा बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच राहुल गांधी यांनी एक ट्विट करत मोदी सरकारचे आश्वासने कशी पोकळ निघालीत याची पोलखोल केली आहे. तसेच शेतकऱ्यांना एकप्रकारे मोदींच्या या असत्याच्या प्रयोगाला न भुलण्याचं आवाहनही केलं आहे.
मोदी सरकारने प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचंही आश्वासन दिलं होतं. त्यासाठी मला 50 दिवस द्या असं ते म्हणाले होते. कोरोना आला तेव्हा आम्ही 21 दिवसात कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू असं ते म्हणाले होते. आमच्या भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याची कोणीही हिंमत करू शकणार नाही, असंही ते म्हणाले होते. मोदींचे हे असत्याचे प्रयोग आहेत. त्यावर देशातील शेतकरी कदापिही विश्वास ठेवणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
---