पुणे / प्रतिनिधी : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटेच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाची कार्यवाही न्यायालयाने सुरू केली आहे. बर्हाटे व...
पुणे / प्रतिनिधी : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटेच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाची कार्यवाही न्यायालयाने सुरू केली आहे. बर्हाटे विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यानंतरही तो मिळून आलेला नाही. त्यानंतर न्यायालयाने तीन नोव्हेंबर रोजी जाहीरनाम्याचा आदेश काढून तो पुणे शहर व परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केला होता. तरीही तो न मिळून आल्याने आता स्थावर मालमत्त जप्तीचे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करुन घेऊन पुणे पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दुसरीकडे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
बर्हाटे, तथाकथीत पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप यांच्यासह 13 जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानूसार (मोक्का) कारवाई केली आहे. हडपसर येथील गुन्हयात बर्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटितपणे टोळी करून व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच बंगला बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. हडपसरच्या गुन्हयासह त्याच्याविरुध्द शहर व ग्रामीणमध्ये 14 हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बर्हाटे व त्याच्या साथीदारांविरुध्द पहिला गुन्हा कोथरुड पोलिस ठाण्यात 7 जुलै 2020 रोजी दाखल झाला होता. बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी त्याने केली होती. त्यानंतर 12 जुलै रोजी समर्थ पोलिस ठाण्यातही एका बांधकाम व्यवसायिकाला धमकावून त्याच्याकडून 72 लाख रुपये घेऊन आणखी पावणेदोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला, तर तिसरा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यामध्ये कोथरुड व औंध येथील जमिनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एकाची 30 लाख रुपयांची फसवणूक केली होती. चौथा गुन्हा केटरींग व्यवसायिकाने दाखल केल्यावरुन हडपसर पोलिस ठाण्यातच दाखल झाला होता.
बहुतांश गुन्हयात बर्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटितपणे कट रचून नागरिकांना धमकावणे, खंडणी मागणे, मालमत्ता बळकाविणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, हडपसरच्या केटरींग व्यावसायिकाने दाखल केलेल्या गुन्हयात बर्हाटे टोळीतील फरार असलेला आरोपी गणेश मधुकर आमंदे (वय 45, रा.टिळक रोड) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे, पोलिस नाईक मोहसीन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्हयामध्ये आजवर सहा आरोपी अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांनी दिली.