भेंडा/प्रतिनिधी ः ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये ग्राहक हिताचे आमुलाग्र बदल झाले असून फसवणूक झालेल्या ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाह...
भेंडा/प्रतिनिधी ः ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये ग्राहक हिताचे आमुलाग्र बदल झाले असून फसवणूक झालेल्या ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य कारभारी गरड यांनी केले. जिजामाता माध्यमिक विद्यालयात राष्ट्रिय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती या विषयावर गरड बोलत होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सुरेश साबळे, उपप्राचार्य भाऊसाहेब विधाटे, भारत वाबळे, भाऊसाहेब सावंत, डॉ. रजनीकांत पुंड आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच 24 डिसेंबर 1986 ला ग्राहक संरक्षण कायदा देशभरात लागु झाला. नंतर त्यात कालानुरुप बदल व दुरुस्त्या करण्यात आल्या. विशेषताः 2019 मध्ये जिल्हा, राज्य व राष्ट्रिय ग्राहक मंच ऐवजी जिल्हा, राज्य व राष्ट्रिय आयोग असा बदल करण्यात आला. ग्राहकाने वस्तु, माल, साहित्य कोठेही खरेदी केले असले तरी ग्राहक राहत असलेल्या जिल्ह्यातील ग्राहक आयोगात तक्रार दाखल करता येणार. फसव्या बोगस व चुकीच्या जाहिराती दाखविणारा व जाहिरातीमधील उत्पादक, कंपनी यांच्यावर गुन्हा दाखल करुन दंडात्मक कारावास कारवाई करता येते. एखादी वस्तु व साहित्य खराब, धोकादायक, सदोष निघाल्यास उत्पादक, वितरक व विकेत्यावर दंडात्मक व कारावासाची तरतुद आहे. म्हणून आवश्यकता वाटल्यास ग्राहकांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा, असेही गरड म्हणाले.