कर्जत/प्रतिनिधी ः मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या दुर्लक्षामुळे कर्जत शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तब्बल सहाव्या द...

कर्जत/प्रतिनिधी ः मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या दुर्लक्षामुळे कर्जत शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तब्बल सहाव्या दिवशी आज कर्जत शहराला पाणीपुरवठा झाला नाही. कर्जत शहराला पाणीपुरवठा करणारी योजना झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी वेळ कर्जतकरांवर आली आहे.मुख्याधिकारी यांनी कारभार सुधारावा अशी मागणी रिजवान मुन्नाभाई पठाण यांनी केली आहे.
मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी इतर बाबींपेक्षा पाणीपुरवठा या महत्त्वाच्या विषयात प्राधान्याने लक्ष घालण्याची गरज आहे. मात्र त्यांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले असून ही कर्जतकरांसाठी गंभीर बाब आहे. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवकांची मुदत संपताच जर नियोजनाचा अभाव यापद्धतीने जाणवत असेल तर भविष्यात निवडणुका होईपर्यंत कर्जतकरांना अशा संकटांना तोंड द्यावे लागणार का ? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या भेडसावत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही प्रतिष्ठान व संघटनांनी मागील दोन-तीन दिवसांपासून कर्जत शहरांमध्ये पाणी वाटपाला सुरुवात केली आहे. कित्येक दिवसानंतर कर्जत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची ये-जा सुरू झाली आहे. या पाच-सहा दिवसात पाणी विक्री करणार्यांचा व्यवसाय तेजीत आला आहे. कर्जतमधील नागरिकांच्या माथ्यावर अतिरिक्त खर्च टाकणारी ही बाब आहे. त्यामुळे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी याबाबतीत लक्ष घालावे अशी नागरिकांमधून मागणी केली जात आहे.