हजारे यांची मोदी सरकारवर टीका; शेतकर्यांसाठी शेवटच्या आंदोलनास तयार अहमदनगर / प्रतिनिधी : नवी दिल्ली येथे काही दिवसांपासून सुरू असलेल्या ...
हजारे यांची मोदी सरकारवर टीका; शेतकर्यांसाठी शेवटच्या आंदोलनास तयार
अहमदनगर / प्रतिनिधी : नवी दिल्ली येथे काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनास पाठिंबा आहे. तीन वर्षांपासून शेतकर्यांच्या मागण्यांसाठी मी संघर्ष करीत आहे. दोन वेळा दिलेले लेखी आश्वासन केंद्र सरकार पाळत नाही.
याला काय सरकार म्हणावे, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णआ हजारे यांनी केला. दिल्लीत आंदोलनासाठी रामलीला किंवा जंतरमंतर मैदानावर जागा मिळाली, तर शेतकर्यांसाठी शेवटचे आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात हजारे यांनी सहभागी व्हावे, यासाठी पंकज श्रीवास्तव (बिहार), मोहित शर्मा (दिल्ली), राजरतन शिंदे, प्रदीप मेटी, किरणकुमार वर्मा, सतीशकुमार पुरोहित (कर्नाटक) या सहा शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने आज (ता. 20) राळेगणसिद्धी येथे त्यांची भेट घेत सुमारे एक तास चर्चा केली. या वेळी हजारे बोलत होते.
शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धीत प्रवेश केल्यानंतर लगेच थाळी वाजवत आंदोलन करण्यास सुरुवात केली. हजारे यांच्या कार्यालयाकडून अण्णा आपणाला भेटणार असल्याचे सांगितल्यावर ते भेटीसाठी गेले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. हजारे यांनी दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला, तर आंदोलनाची ताकद निश्चितच वाढेल. आपल्याकडे संपूर्ण देश दुसरे गांधी म्हणून पाहत आहेत व तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहेत. अशा भावना शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केल्या.
या वेळी हजारे म्हणाले, की माझा केंद्र सरकारबरोबर शेतकर्यांच्या प्रश्नांवर संघर्ष सुरूच आहे. स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव (सी 2 + 50) मिळावा. निवडणूक आयोगाप्रमाणे कृषी मूल्य आयोगाची स्थापना करावी यासह इतर मागण्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून आपला लढा सुरू आहे. केंद्र सरकार दिलेले आश्वासन पाळत नाही. देशातील सर्व जेल ज्या वेळी भरून जातील, त्या वेळी खर्या अर्थाने सरकारला जाग येईल. त्यासाठी देशातील शेतकर्यांसह सर्व जनतेने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. सरकार कोणत्या गोष्टीला घाबरत असेल तर त्यांनी सर्वात जास्त भीती ही पडण्याची असते. त्यामुळे दिल्लीतील शेतकरी आंदोलनात देशातील सर्व शेतकर्यांनी सहभागी झाले पाहिजे, असे हजारे म्हणाले.
या वेळी माजी उपसरपंच लाभेष औटी, सुरेश पठारे, दादा पठारे, संजय पठाडे, गणेश भोसले, शाम पठाडे, अमोल झेंडे, अन्सार शेख, राजाराम गाजरे, सुनील जाधव, शांताराम जाधव आदी उपस्थित होते.