मुंबई : अन्न व नागरी पुरवठा विभागात पारदर्शकता यावी यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच चांगल्या दर्जाचे तांदूळ पुरवठा विभागाला मि...
मुंबई : अन्न व नागरी पुरवठा विभागात पारदर्शकता यावी यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच चांगल्या दर्जाचे तांदूळ पुरवठा विभागाला मिळावे, यासाठी विभागामार्फत करण्यात येणार्या धान खरेदी केंद्राबरोबरच धानाचे मिलिंग होणार्या मिलमध्येही सीसीटीव्ही बसवावेत, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत बळकटीकरण व पारदर्शकता आणण्यासंदर्भात राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव विलास पाटील, सहसचिव मनोकुमार सुर्यवंशी यांच्यासह माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील वितरण व्यवस्थेचा आढावा घेऊन डॉ. कदम म्हणाले की, विभागाने यापूर्वीच धान खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आपल्या शेतकर्यांनी पिकवलेले चांगल्या दर्जाचे धान्यच पुरवठा विभागामार्फत राज्यातील जनतेला वितरित व्हावे, यासाठी धानाचे मिलिंग होणार्या भात गिरण्यांच्या ठिकाणीही सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. तसेच बाजारातील बदलून दिलेला निकृष्ट तांदूळ शासनाला मिळू नये, यासाठी भात गिरण्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करण्याचे निर्देशही राज्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले. धानाचे मिलिंग होणार्या ठिकाणापासून ते गोडाऊन आणि रेशन दुकान या सर्व प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने संगणक प्रणाली विकसित करावी. रेशनचे अन्नधान्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोचावे, यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. तसेच यापूर्वी अन्नधान्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न विभागाने केला. मात्र, त्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. आता अन्नधान्य वाहतुकीसाठी प्रगत अशा जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित प्लिकेशन येत्या तीन महिन्यात तयार करावे. त्यामध्ये वाहन जेथून धान्य घेऊन निघाले तेथील फोटो व जेथे धान्य पोचवले त्या ठिकाणचे फोटो हे जिओ टॅगिंगद्वारे त्या पवर अपलोड करावे. यामुळे रेशनच्या गैरप्रकाराला आळा बसेल, असेही डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले. डॉ. कदम म्हणाले की, पुरवठा विभागातील धान्य चोरीसंदर्भात अनेक तक्रारी, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न उपस्थित होत असतात. पुरवठा विभागातील धान्य चोरी करणार्या लोकांची यादी तयार करून अशा लोकांवर कारवाई करावी. सध्या नवीन वाहतूकदार नेमण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रक्रियेत निकोप स्पर्धा होण्यासाठी अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, जेणेकरून अधिक स्पर्धा होऊन योग्य असे पुरवठादार विभागाला मिळतील. त्यातून तळागाळापर्यंत योग्यरितीने धान्य पुरवठा होईल. पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांनी आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगढ या राज्यातील पुरवठा विभागात करण्यात आलेल्या सुधारणा, तेथे वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर यांचा अभ्यास करून विभागात करण्यात येणार्या सुधारणांसंबंधीचे सादरीकरण केले. राज्यमंत्री महोदयांचे खासगी सचिव संपत डावखर, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अवर सचिव ज्योत्स्ना माडेकर, औरंगाबादचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एन. भास्कर, वि.क. यादव आदी यावेळी उपस्थित होते.