महाराष्ट्रात 1195 पर्यंत काँग्रेसला कोणाचीही मदत न घेता सत्ता सांभाळता आली. अपक्षांची मदत घ्यावी लागली, हा भाग वेगळा; परंतु त्यानंतर काँग्...
महाराष्ट्रात 1195 पर्यंत काँग्रेसला कोणाचीही मदत न घेता सत्ता सांभाळता आली. अपक्षांची मदत घ्यावी लागली, हा भाग वेगळा; परंतु त्यानंतर काँग्रेस कधीही स्वबळावर सत्तेत आली नाही. 1999 ते 2014 पर्यंत काँग्रेस सत्तेत होती. सर्वाधिक जागा मिळवणारा हा पक्ष गेल्या वर्षी चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. काँग्रेसची ही वाताहात का झाली, याचे आत्मचिंतन काँग्रेसजणांनी कधीच केले नाही. शिवसेना, भाजपला राजकीय विरोधक मानण्याऐवजी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे काम केले. दोन्ही मित्रपक्षांनी परस्परांचे खच्चीकरण केले. त्यातून दोघेही सावरले नाहीत. मागच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी धुरा सांभाळली नसती, तर काँग्रेसला सध्या मिळाल्या, तेवढ्याही जागा मिळाल्या असत्या, की नाही, याची शंका आहे. काँग्रेसमधील गटबाजी अजूनही संपायला तयार नाही. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाविरोधात त्यांचेच सहकारी एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचे सरकारमध्ये चांगलेच सूर जुळले असताना काँग्रेसमधील अंतर्विरोध त्यांना सरकारमध्ये सहभागी असूनही जुळवून घ्यायला अडचणी निर्माण करीत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कधी दोन पावले पुढे, तर एक पाऊल मागे घेऊन परस्परांशी जुळवून घेतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपशी युती करू नका, असे बजावले आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवसेनेशी जुळवून घ्या, असा संदेश आपल्या पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे तर पारनेरच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांना परत शिवसेनेत पाठविण्यात आले. परभणी बाजार समितीवरील नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली. एकीकडे हे चित्र असताना थोरात यांनी भाजपत गेलेल्या स्वकीयांना परत काँग्रेसमध्ये आणताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही काँग्रसमध्ये घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीेने त्याची परतफेड भिवंडीच्या 18 नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्परांचे मित्र असतानाही ते परस्परांच्या नेत्यांना प्रवेश देतात. हे खरे तर मित्रपक्षाचे खच्चीकरण आहे. त्यातही सरकारमध्ये तीन पक्ष सहभागी झाले असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच सरकारवर प्रभाव दिसतो. काँग्रेस मात्र वाद घालत बसली आहे. सरकारचे भागीदार असूनही निर्णय प्रक्रियेत काँग्रेसचा सहभाग कुठेही दिसत नाही. महाविकास आघाडीचे दोन सहकारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मागे काँग्रेसचे फरफटणे सुरू असते.
महाराष्ट्रात 105 जागा मिळवलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यात तीन पक्ष एकत्रव आले. भाजप नेते महाराष्ट्रातील शिवसेनेचे सरकार पाडणार नाही, असे म्हणतात आणि सरकार पाडण्याची वाट पाहत बसले आहेत. सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, असे भाजप नेते म्हणतात. सरकारमधील तीन पक्ष भाजपचा अंतर्विरोधाचा दावा खरा नसल्याचे म्हणत असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यात पुरेपूर अंतर्विरोध भरला आहे. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेले किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देणारे पत्र त्याचाच भाग आहे. या पत्रावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असली, तरी तेवढीही किंमत हे दोन पक्ष काँग्रेसला द्यायला तयार नाहीत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोनिया गांधी यांचे पत्र सल्ला आहे, काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून त्यांना पत्र पाठविण्याचा अधिकार आहे, असे सांगून वेळ मारून नेली. या पत्रात दबावाच्या राजकारणासारखे काहीही नाही, असे ते म्हणत आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद शरद पवार यांना देण्यावरूनही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाले आहेत. शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक पक्ष नाही, त्यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीचा अध्यक्ष कोण़ करायचे, हे ठरविण्याचा अधिकार शिवसेनेला नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी राऊत यांच्यावर केली. काँग्रेसची शिवसेनेबरोबर युती केवळ महाराष्ट्रासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केेले. काँग्रेसविरोधात शिवसेनेने प्रथमच टीका केली आहे, असे नाही. शेतकरी आंदोलन, पश्चिम बंगालमधील भाजपचे कुरघोडीचे राजकारण आदी प्रकरणात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कशी कमी पडत आहे, याचा पाढा शिवसेनेने मुखपत्रातून वाचला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी काँग्रेसच्या तोंडावर ती जुनी खाट असल्याचा उपहास करण्यात आला. उद्धव ठाकरे पंतप्रधान झालेले पाहायला आवडतील, असे राऊत म्हणत असले, तरी शिवसेनेला राष्ट्रीय महत्वाकांक्षा नाही. त्यांना महाराष्ट्राची सत्ता हवी आहे. मुंबईसह काही महानगरपालिका, नगरपालिका ताब्यात आल्या, तरी शिवसेनेचे त्यावर समाधान होऊ शकते. राष्ट्रवादी हादेखील एक प्रादेशिक पक्ष आहे. पवार यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा होती; परंतु आता त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली आहे. देशातील इतर राज्यात कार्यरत असलेल्या अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशीही त्यांची चांगली मैत्री आहे. त्यांनी स्वतःच संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष होण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले.
शिवसेनेने भाजपशी 1985 मध्ये असा समान करार केला, की राष्ट्रीय राष्ट्रीय राजकारणात भाजप आणि शिवसेना राज्याच्या राजकारणात राहील; परंतु महाराष्ट्रात भाजपने आपला आधार वाढविला. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाची टक्केवारी नेहमीच शिवसेनेपेक्षा जास्त राहिली आहे. राष्ट्रीय राजकारणात भाजपला शिवसेनेची फारशी गरज नव्हती. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा अवघी एक जागा कमी मिळूनही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले. सरकार स्थापनेतील पवार यांची भूमिका लक्षात घेऊन शिवसेना सातत्याने पवार यांना मोठेपण देत राहिली; परंतु काँग्रेसला 45 जागा मिळवून देण्यात मोठे योगदान असूनही काँग्रेस मात्र पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हात आखडता घेत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना जवळ येत असताना त्यामुळे काँग्रेस मात्र या दोन्ही पक्षापासून दुरावत चालली आहे. पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्यासाठी आज शिवसेनेने तोंड उघडले आहे, तर उद्या, अन्य भाजपविरोधी राज्यांचे प्रादेशिक पक्षदेखील तोंड उघडू शकतील. दबाव वाढल्यास काँग्रेसला यूपीए अध्यक्षपदही सोडावे लागू शकते. त्यामुळे भाजपाचे नुकसान होणार नाही. महाराष्ट्राच्या अंतर्गत राजकारणामध्येही काँग्रेसला शिवसेना-राष्ट्रवादीच्या जवळ येण्याचे नुकसान सहन करावे लागत आहे. पंचायत निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर एकत्र लढण्याची चर्चा राष्ट्रवादी व शिवसेना करीत आहेत; परंतु महाराष्ट्र काँग्रेसमधील नेतृत्वाची स्थिती सर्वश्रुत आहे. कोणत्याही स्तरावरील निवडणुकीत आपले हक्काचे पदराच पाडून घेण्यासाठी काँग्रेसला प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागतो आहे. राज्यसभेच्या जागा, विधान परिषदेच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी इशारे द्यावे लागले. काँग्रेसला नुकसान सहन करावे लागत असले, तरी तिला शिवसेना व राष्ट्रवादीबरोबर राहणे भाग पडले आहे. काँग्रेसमध्ये अंतर्विरोध आहे. थोरात यांच्या नेतृत्वाविरोधात नितीन राऊत, यशमोती ठाकूर, विजय वडेट्टीवार,अशोक चव्हाण आतून कुरघोडीचे राजकारण करीत असतात. थोरात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात काँग्रेसचे नुकसान झालेले नाही. उलट, पुणे आणि नागपूरच्या विधान परिषदेच्या जागा काँग्रेसला मिळाल्या, याचे नेत्यांना भान नाही. थोरात यांचे पवार यांच्याशी चांगले संबंध काँग्रेसमधील अन्य नेत्यांना खुपत असल्यानेही काँग्रेसची फरफट होत आहे.
---------------