नाशिक : महाराष्ट्राला हजारो फौजदारांसह शेकडो वरिष्ठ अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत कोरोना विषाणूने सहज प्रवेश मिळवल्याने चिंताय...

नाशिक : महाराष्ट्राला हजारो फौजदारांसह शेकडो वरिष्ठ अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत कोरोना विषाणूने सहज प्रवेश मिळवल्याने चिंतायुक्त आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये तब्बल १६७ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासान आणि मनपा प्रशासनाचीही झोप उडाली आहे.
मागील आठ दिवसांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एकूण ८९४ संशयितांची कोविड-१९ची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामधील सुमारे १२७ रुग्णांवर ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.उरलेल्या रूग्णांवर मविप्र वैद्यकीय महाविद्यालयासह अन्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.अशी माहीती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डाॕ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. आठवडाभरापासून पोलीस ॲकेडमीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली.
लाॕकडाऊनपासून शहर जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्नशील आहे.जिल्हाधिकारी सुरज मांढरे स्वतः डोळ्यात तेल घालून मिशन अँन्टी कोरोना राबवित आहेत.त्याचा सकारात्मक परिणाम दिसत असतानाच एमपीएत घाऊक बाधा झाल्याने एकूणच प्रशिक्षण केंद्राच्या गलथान व्यवस्थापनावर टिकेची झोड उठत आहे. पोलीस अकादमीमधून प्रशिक्षणार्थी उमेदवारांपासून स्वयंपाकीसह चतुर्थश्रेणीतील सर्व कर्मचारी वर्गाला अकादमीचा दरवाजा ओलांडण्यास मज्जाव, विविध कामासाठी बाहेरुन येणाऱ्या वाहनांना अकादमीच्या प्रवेशद्वारावरच निर्जंतुक करुन प्रवेश देणे, अधिकारी वर्गांचे तपमान व ऑक्सिजनपातळी तपासून प्रवेश देणे आदी खबरदारी घेतली जात असतानाही कोरोना विषाणूने शिरकाव केल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानंतर प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांना तसेच चतुर्थश्रेणीतील सर्व कर्मचाऱ्यांना ॲकेडमीच्या आवारातून बाहेर जाण्यास पुर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. परिंदा भी पर नही मार सकता एव्हढा काटेकोर बंदोबस्त असलेल्या या पोलीस प्रशिक्षण केंद्राची सारी सुरक्षा व्यवस्था कोरोना विषाणूने माञ भेदली.