दर्शनासाठी तालुक्यातून भाविकांचा ओघ वाढला कर्जत/प्रतिनिधी ः राज्यभरातील समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत सदगुरु संत बाळूमामा यांच्या अदमापूर...
दर्शनासाठी तालुक्यातून भाविकांचा ओघ वाढला
कर्जत/प्रतिनिधी ः राज्यभरातील समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत सदगुरु संत बाळूमामा यांच्या अदमापूर या तीर्थक्षेत्रातील मानाच्या मेंढरांच्या कळपाचे कुळधरण येथे ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. पोलीस पाटील समीर जगताप यांच्या शेतामध्ये ही मेंढरे बसविण्यात आली आहेत. पालखीचे दर्शन घेण्यासाठी तालुक्याच्या विभागातील भाविकांचा ओघ सुरू आहे.
सोमवारी या मानाच्या मेंढरांचे कुळधरण येथे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. दररोज आरती तसेच महाप्रसादाचे वाटप केले जात आहे. संत बाळुमामांच्या अदमापूर या गावातील मेंढरांचे कळप शेतात बसविणे हे शुभ मानले जाते. मानाचे अश्व व मेंढरे गावात आल्यानंतर आपल्याच शेतात मुक्कामी बसावी तसेच पिकात चराई करून देण्यासाठी भाविकांची चढाओढ असते. दररोज सकाळी 9 वाजता आरती केली जाते. आरती व महाप्रसाद कार्यक्रमासाठी कुळधरणसह राक्षसवाडी, जलालपूर, कोपर्डी, सुपेकरवाडी, गुंडाचीवाडी, पिंपळवाडी, बेलवंडी, राशीन आदी भागातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. महाप्रसाद कार्यक्रमासाठी ग्रामस्थांकडून मोठे योगदान दिले जात आहे.
बाळूमामांचा मुक्या प्राण्यांवर जीव होता. त्यांची मेंढरं आपल्या परिसरात आली आहेत. त्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असे मानून सर्व ग्रामस्थांनी याकडे पहावे. साधारणपणे पंधरा ते वीस दिवस ही पालखी आपल्या परिसरामध्ये राहील. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
समीर जगताप, कुळधरण