शिवभोजन थाळीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद कोरोना काळात गरजूंना योजनेचा मिळाला आधार बुलडाणा, दि. 9 : राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यां...
शिवभोजन थाळीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
कोरोना काळात गरजूंना योजनेचा मिळाला आधार
बुलडाणा, दि. 9 : राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेच्या ल्ज्जतदार थाळीमुळे जिल्ह्यात नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीची लज्जत वाढतच आहे. शिवभोजन केंद्रांवर दररोज 11 ते 3 यावेळेत थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या शहरात सर्वप्रथम शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार बुलडाणा शहरातही तीन ठिकाणी शिवभोजन योजना सुरू आहे. यामध्ये बसस्थानक, जिजामाता प्रेक्षागार परीसर व कृषि उत्पन्न बाजार समिती या ठिकाणांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात 17 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू आहेत. मोताळा, मलकापूर, सिंदखेड राजा, नांदुरा, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, जळगांव जामोद, शेगांव व खामगांव येथेही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकट काळात गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना नाममात्र पाच रूपये दरात शिव भोजन थाळी योजने अंतर्गत दर्जेदार जेवण देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात 17 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून दररोज दोन हजार थाळी ‘पॅकींग फुड’ स्वरूपात देण्यात येत आहेत. जिल्ह्यात मार्च ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत 4 लक्ष 83 हजार 612 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.