शिर्डी/प्रतिनिधी : देशातील श्रीमंत देवस्थानात गणना होणारे शिर्डीचे साईबाबा संस्थानमधील कर्मचारी आध्यात्मिक शिक्षेच्या नावाखाली सध्या तोंडी ...
शिर्डी/प्रतिनिधी : देशातील श्रीमंत देवस्थानात गणना होणारे शिर्डीचे साईबाबा संस्थानमधील कर्मचारी आध्यात्मिक शिक्षेच्या नावाखाली सध्या तोंडी आदेशाच्या फर्मानाने तणावाखाली वावरत असल्याची माहिती पुढे आली आहे. श्रद्धेपोटी आरतीला हजर राहण्याचा मान मिळाला असता तर कोणालाही आवडला असता. मात्र केवळ बेशिस्तीच्या नावाखाली चार आरत्यांना उभे राहण्याची अजब शिक्षा दिली गेल्याने येथील कर्मचारी त्रस्त झाले आहेत. नोकरी जावू नये म्हणून कर्मचारी हे मुकाट्याने सहन करत असल्याचे समजते. दरम्यान येथील बदली झालेले पण नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त न झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांनी अलिकडे नियमबाह्य तोंडी आदेश देण्याचा सपाटा लावला आहे. याचा फटका साईबाबा संस्थानसह शिर्डीतील प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीना बसला आहे.
एकीकडे संपुर्ण देश अनलॉक होतोय अशा वेळी याठिकाणी अनेक बंधने लादली जात आहेत. कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने काही कर्मचाऱ्यांना साईबाबा मंदिरात दिवसभरात होणाऱ्या चारही आरत्यांना हजर राहण्याची आध्यात्मिक शिक्षा सुनावली व त्याची अमलबजावणी करुन घेतली. त्याच सोबत साई मंदिर परिसरात स्थानिक पत्रकाराना यायचे असेल तर काय काम आहे? कुणाकडे काम आहे? याची विचारणा केली जाते. तसेच संबधित पत्रकाराला जनसंपर्क कार्यलयात नोंदवहीत आपल्या येण्याची नोंद करणे अनिवार्य केले हा ही आदेश तोंडी दिला असल्याची माहिती मिळाली आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, साईबाबा संस्थानचा कारभार पाहण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाने चार सदस्य समिती नेमलेली आहे. त्याचे अध्यक्ष हे जिल्हा प्रधान न्यायाधीश असूनही या समितीचे सर्व अधिकार के. एच. बगाटे हेच वापरत असल्याचे दिसून येते. मध्यंतरी काही कर्मचाऱ्यांनी संस्थान अध्यक्ष अणेकर यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या होत्या. त्याला अणेकर यांनी दिलेल्या लेखी उत्तराने बगाटे हे अनेक महत्वाचे निर्णय परस्पर घेत असल्याचे उघड झाले आहे.