मुंबई, 5 डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थि...
मुंबई, 5 डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावरून काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली आहे. काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या बाल व महिला कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे.
'सरकार स्थिर चालवायचं असेल तर आमच्या नेत्यावरील टीका टाळा', असा थेट इशारा यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत मित्र पक्षांना दिला आहे. आता त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एवढंच नाही तर राऊतांनी काँग्रेसला राजकीय सल्लाही देऊन टाकला आहे.
संजय राऊत म्हणाले, काँग्रेसला राहुल गांधी यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, राहुल गांधींच्या नेतृत्त्वाबात आतापर्यंत भाजपकडून वारंवार सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही राहुल गांधी थोडेही डगमगले नाहीत. राहुल गांधी कुठेही आपल्या परिश्रमात कुठेही कमी पडत नाही. मात्र, राहुल यांना नशीब साथ देत नाही आहे. त्यात प्रश्न आला शरद पवार यांच्या बोलण्याचा तर त्यांचं बोलणे हे काँग्रेसनं मार्गदर्शन म्हणून स्वीकरलं पाहिजे. आम्ही देखील त्यांचं मार्गदर्शन घेतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर शिवसेना पक्षप्रमुख आहेत. ते देखील शरद पवारांचं मार्गदर्शन घेतात, असं सांगत संजय राऊत यांनी काँग्रेसला चिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.
शरद पवारांना दांडगा अनुभव आहे. ते जेव्हा काही बोलतात तेव्हा त्यांचा अभ्यास असतो. त्यामुळे त्यांच्या अनुभवापेक्षा कमी असलेल्या राहुल गांधी यांनीच नाही तर कुणीही त्यांचं बोलणं हे मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं. कारण सगळ्यांनाच पंडित नेहरू, नरेंद्र मोदी तर शरद पवार होता येणार नाही. प्रत्येकाला काही ना काही मर्यादा असतात तशा राहुल गांधींमध्येही आहेत. त्यांनी त्या स्वीकारायला हव्या, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितल.
हैदराबाद निवडणूक: भाजपची थोपटली पाठ
हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, हे यश आहे. भाजप 4 वरून थेट 50 वर पोहोचला. मात्र, हैदराबादमध्ये काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. निकालाची पर्वा न करता काँग्रेसनं झोकून देऊन काम करायला हवं. काम लोकांना दिसलं की आपोआप पाठिंबा मिळतो, असं संजय राऊत सांगितलं.
राहुल गांधी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं आणि कामाला लागावं, असं मतही राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.