सातारा / प्रतिनिधी : कुत्र्याला चिकनचे तुकडे टाकत असल्यावरून तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणातून मंगळवार, दि. 16 रात्री येथील समर्...
सातारा / प्रतिनिधी : कुत्र्याला चिकनचे तुकडे टाकत असल्यावरून तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणातून मंगळवार, दि. 16 रात्री येथील समर्थ मंदिर परिसरात धारदार शस्त्राने वार करत युवकाचा खून करण्यात आला. बजरंग लक्ष्मण गावडे (वय 32, रा. समर्थ मंदिराजवळ, सातारा) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.
समर्थ मंदिराजवळ बजरंग गावडे हे राहण्यास होते. त्यांचा पशुपालनाचा व्यवसाय होता. गावडे आणि त्याच परिसरातील आकाश बल्लाळ यांच्या सन 2017 मध्ये कुत्र्याला चिकनचे तुकडे देण्याच्या कारणावरून वाद झाला होता. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने तक्रारी नोंदविल्या होत्या. या वादाचा राग बल्लाळ याच्या मनात कायम होता. काल रात्री गावडे हे दुचाकीवरून जनावरांना चारा घालण्यासाठी निघाले होते. वाटेतच अडवत चौघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. ते जिव्हारी बसल्याने गावडे हे रक्ताच्या थारोळ्यात जागीच निपचित पडले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
माहिती मिळाल्यानंतर गावडे कुटुंबीय त्या ठिकाणी आले. थोड्या वेळात सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सातारा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल वायकर आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गावडेंना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळावरून, तसेच गावडे यांच्या नातेवाइकांकडून माहिती घेत सातारा शहर पोलिसांनी आकाश नितीन बल्लाळ (वय 23), अमन इस्माईल सय्यद (वय 20), तुषार प्रल्हाद धोत्रे (वय 21), आकाश उदयसिंह शिंदे (वय 23, सर्व रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना अटक केली.
या कारवाईत उपनिरीक्षक नानासाहेब कदम, अनिल पाटील, सहायक फौजदार विश्वास कडव, हवालदार अजित जगदाळे, प्रशांत शेवाळे, शिवाजी भिसे, सणस, अविनाश चव्हाण, अरुण दगडे, गणेश घाडगे, अभय साबळे, गणेश भोंग, विशाल धुमाळ हे सहभागी झाले होते. मृत बजरंग यांचे भाऊ गणेश गावडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.