पारनेर / प्रतिनिधीः पारनेर-नगर मतदार संघातील 110 ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या 15 जानेवारी रोजी होणार असून त्या त्या गावांतील नागरिकांनी...
पारनेर / प्रतिनिधीः पारनेर-नगर मतदार संघातील 110 ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या 15 जानेवारी रोजी होणार असून त्या त्या गावांतील नागरिकांनी बिनविरोध निवडणूक करावी, यासाठी आमदार निधीमधून त्या गावांना 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा आ. नीलेश लंके यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी आ. लंके यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांची भेट घेतली. बिनविरोध निवडणूकांदर्भातील माहिती त्यांनी हजारे यांना दिली. हजारे यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी हजारे यांचा प्रचारक म्हणून काम करण्याची ग्वाही दिली.
यावेळी हजारे म्हणाले, की आ. लंके यांनी उचललेले हे पाऊल गावापुते मर्यादित नाही. लोकशाही बळकट व्हावी, मजबूत व्हावी अशा दृष्टीने उचललेले हे पाऊल आहे. आपण मयार्दित विचार करतो. देशासाठी, समाजासाठी दुरदृष्टी हवी. देश एका संकटातून चालला आहे. जाती, पाती, धर्म, वंश यांच्यातील द्वेष वाढत आहे. हा धोका आहे. हा धोका टाळायचा असेल तर आ. लंके यांनी हाती घेतलेल्या उपक्रमास गावागावातून प्रतिसाद मिळाला पाहिजे. तसे झाले महाराष्ट्राला दिशा मिळेल. महाराष्ट्राला दिशा मिळाली, तर देशातील अनेक राज्ये त्याचे अनुकरण करतील.
लोकशाहीसाठी आ. लंके यांचे प्रयत्न
इंग्रजांना घालवून क्रांतिकारकांनी या देशात लोकशाही आणली, इंग्रज गेले; परंतु खरी लोकशाही आली नाही. ती लोकशाही यावी या दृष्टीने आ. लंके यांनी जो प्रयत्न चालविला आहे तो मला महत्वाचा वाटतो. कोण सरपंच झाला, कोण आमदार, खासदार झाला याच्याशी मला कर्तव्य नाही; परंतु लोकशाही मजबूत होण्यासाठी उचललेले पाऊल मला महत्वाचे वाटते, असे सांगून ते म्हणाले, की गांधीजी सांगत गाव बदलल्याशिवाय देश बदलणार नाही. आधी गावच बदलावे लागेल. आज खेडयांतील विकास थांबला आहे तो निवडणूकांमुळे. राजकीय गट, तटामुळे विकास थांबला. एका निवडणुकीतील मतभेदाचे लोण पाच वर्षेे राहते. त्यामुळेच आ. लंके यांनी हाती घेतलेल्या उपक्रमामुळे लोकशाही मजबूत होईल. प्रत्येक गावातील द्वेष भावना कमी होणे गरजेचे आहे. गट, तट, राजकारण थांबले पाहिजे. लोकशाहीत निवडणूक करणे दोष नाही; परंतु सत्ता व पैसा हा निवडणूकीतील दोष असून लोक त्यात अडकले आहेत. त्यासाठीच बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे आहे. राळेगणसिद्धीत 50 वर्षांत दोन-तीन निवडणुका झाल्या. त्यामुळेच येथे विकास झाला, असा दावा त्यांनी केला.