अहमदनगर: पुढील वर्षी हजला जाणार्या यात्रेकरूंना हज समितीचे अर्ज भरण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनामुळे या वेळी हज या...
अहमदनगर: पुढील वर्षी हजला जाणार्या यात्रेकरूंना हज समितीचे अर्ज भरण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनामुळे या वेळी हज यात्रेसाठी जादा पैसे मोजावे लागणार असून मागील वर्षाच्या तुलनेत यात्रेचा खर्च यंदा सव्वा लाख रुपयांनी वाढला आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या हज समितीच्या वतीने 2021 यावर्षी हजला जाणार्या भाविकांसाठी हज यात्रेचे अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी आंतरराष्ट्रीय पासपोर्ट, आधारकार्ड, बँक पासबुक, दोन फोटो, रक्तगट अशी माहिती आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी म्हणजे 2020 ची हज यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. यात्रेकरूंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना कोणत्याही कपातीशिवाय केंद्रीय हज समितीकडून परत करण्यात आली; मात्र पुढीलवर्षी म्हणजे 2021 ची हज यात्रा होणार असल्याचे हज समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. त्याचे अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हज कमिटीकडून जाहीर करण्यात आलेल्या गाइडलाइन व अॅक्शन प्लॅननुसार या वर्षी हज यात्रेकरूंना यात्रेसाठी तीन लाख 75 हजार रुपये भरावे लागणार आहेत. प्रारंभी दीड लाख रुपये जमा करावे लागणार आहेत. 2019 मध्ये हज यात्रेचा खर्च अडीच लाख रुपये होता. त्या वेळी सुरुवातीला 81 हजार रुपये जमा करावे लागत होते. आता हज यात्रा महाग झाली आहे. याशिवाय केंद्रीय हज कमिटीनुसार कोरोनाच्या कारणामुळे जागांचा कोटासुद्धा कमी करून एक-तृतीयांश करण्यात आला आहे.
इस्लाम धर्माच्या एकूण पाच स्तंभांपैकी हज हा पाचवा स्तंभ आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वस्थ मुसलमांनी आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे, अशी अपेक्षा असते. हज यात्रेसाठी दरवर्षी जवळपास 20 लाख लोक सहभागी होत असतात. सौदी अरेबियाची स्थापना झाल्यानंतर 90 वर्षांमध्येही कधीही हज यात्रा रद्द करण्यात आली नव्हती. कोरोनामुळे या वर्षी ती वेळ आली होती. पुढील वर्षापासून ती पुन्हा सुरू होत असून अन्य महागाईसोबतच कोरोनाविषयक उपाययोजनांमुळे यात्रेचा खर्च वाढणार आहे.