मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी मुंबई : कोकण रेल्वेवरील गाड्यांची माहिती, प्रसिद्धीपत्रके आदी केवळ इंग्रजी भाषेतूनच प्रसिद्ध होत आहे. हे ...
मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी
मुंबई : कोकण रेल्वेवरील गाड्यांची माहिती, प्रसिद्धीपत्रके आदी केवळ इंग्रजी भाषेतूनच प्रसिद्ध होत आहे. हे अयोग्य आणि निषेधार्ह असून कोकण रेल्वेची माहिती मराठीतूनच द्यावी, अशी मागणी आज मुंबई मराठी पत्रकार संघाने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक संजय गुप्ता यांच्याकडे पत्राद्वारे केली. संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे आणि कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी गुप्ता यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयात इंग्रजी व हिंदी भाषेबरोबरच मराठीचा वापर करण्याचा नियम आहे. असे असतानाही कोकण रेल्वे आपल्या दैनंदिन वापरात मराठी भाषेला स्थान देत नसल्याचे दिसून येत आहे. कोकण रेल्वेचा मार्ग राज्यातील तीन जिल्ह्यांमधून जातो. महाराष्ट्राने या प्रकल्पासाठी 22 टक्के इतका आर्थिक भार उचलला आहे. यामुळे महाराष्ट्रातून धावणार्या प्रत्येक गाडीची माहिती ही मराठीतूनच असायला हवी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने या पत्राद्वारे केली आहे.