कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे व राजकीय वातावरण आता चांगले तापू लागले आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रत्...
कोल्हापूर :
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे व राजकीय वातावरण आता चांगले तापू लागले आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक पक्ष हा आपले नगरसेवक जास्तीत जास्त प्रमाणात कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. कोल्हापुरात शिवसेनेने आता एकहाती भगवा महापालिकेवर कसा फडकला जाईल असा निर्धार केला आहे. मात्र, कोल्हापूरमध्ये दोन गटांमध्ये विभागलेली शिवसेना हे ध्येय कसे गाठणार हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर विराजमान व्हावा या इराद्याने शिवसेना महापालिका निवडणुकीमध्ये रिंगणात उतरली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. अशावेळी शिवसेना निर्णायक जागेवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. मात्र, राजेश क्षीरसागर आणि संजय पवार असे दोन गट शिवसेनेमध्ये आहेत. त्याचा फटका शिवसेनेला बसणार हे नक्की आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही गटांमध्ये हे वाद आहेत. पक्षश्रेष्ठींना देखील हे वाद गेल्या दहा वर्षांमध्ये मिटवता आले नाहीत. त्यामुळे किमान आता तरी हे दोन्ही गट एकत्र येणार, की एकमेकांना गद्दार म्हणून समजणार हा खरा प्रश्न आहे. कोल्हापूर महानगर पालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. आता हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. त्यामुळे आपली ताकद दाखवायची असेल तर आधी पक्षातील भांडण शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना सोडवावे लागतील.
कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडी वेगळी लढणार का ?
कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. तिन्ही पक्ष आता आगामी निवडणूक एकत्र लढणार नसल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा महाविकास आघाडी स्थापन होऊ शकते. विशेष म्हणजे, काही प्रभागात छुपी युती करत भाजप आणि ताराराणी आघाडीला आव्हान देण्याचीही शक्यता आहे.