इंग्लंडमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग आता जगातील अन्य भागाातही झाला आहे. नव्या विषाणूमुळे मृत्यू होणार्यांचे प्रमाण अजून ...
इंग्लंडमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग आता जगातील अन्य भागाातही झाला आहे. नव्या विषाणूमुळे मृत्यू होणार्यांचे प्रमाण अजून कमी असले, तरी त्याने बिनधास्त राहण्याची गरज नाही. आता युरोपबरोबरच आशिया खंडातही या विषाणूचे अधिक रुग्ण सापडत आहेत. अमेरिका, ब्रिटन, रशिया या मोजक्या देशांत कोरोनाची लस द्यायला प्रारंभ झाला आहे. अगोदरच संशोधित झालेल्या लसीमुळे कोरोनाला अटकाव होऊ शकतो, असे सांगितले जात असले, तरी ते अर्धसत्य आहे.
कोरोना त्याचे कारण नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी या लसी कितपत प्रभावी आहेत, हे अजून सिद्ध व्हायचे आहे. ब्रिटनने आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा पाहिल्या आहेत. पहिली लाट एप्रिल-मे महिन्यात आली होती. जेव्हा संपूर्ण जगच कोरोनाच्या छायेखाली होते, तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातही कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. नोव्हेंबर महिन्यातील कोरोनालाट आधीपेक्षा घातक होती. त्या वेळी दररोज 20 हजारापेक्षा अधिक कोरोनाग्रस्त सापडत होते. त्या धक्क्यातून जरा कुठे सावरत असतानाच कोरोनाच्या नव्या अवताराने ब्रिटनचे धाबे दणाणले आहे. त्याचे कारण घातक लाटेपेक्षाही आता दुप्पट रुग्ण सापडत आहेत. सोमवारच्या दिवशी तब्बल 41 हजार 385 नवे कोरोनाग्रस्त आढळल्याने प्रशासनही हादरले आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला होता; मात्र नव्या कोरोना अवताराचा प्रसार लंडन आण इसेक्समध्ये वेगाने होत आहे, हे नोव्हेंबरमध्ये शास्त्रज्ञांनी शोधले. 11 डिसेंबरला ब्रिटनच्या सरकारला नवा स्ट्रेन आणि त्याच्या वाढलेल्या प्रसारक्षमतेबद्दल माहिती मिळाली. या अवताराची प्रसार क्षमता 70 टक्के अधिक असल्याचे समोर आलं आहे. सार्स कोव्हिड 2 या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा शिरकाव भारतात झाला आहे. त्यामुुळे आपल्यालाही सावध राहण्याची गरज आहे. जवळपास 20 भारतीय नागरिकांना या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. आतापर्यंत डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, फ्रान्स, स्वीडन, स्वीत्झर्लंड, स्पेन, कॅनडा, जर्मनी, लेबनॉन, जपान आणि सिंगापूर या देशांमध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यांनतर तो भारतातही आला आहे. भारतात आढळलेल्या 20 रुग्णांपैकी तीन जण बंगळूर, दोन हैदराबाद आणि एक रुग्ण पुणे येथील आहे.
उत्तर प्रदेशमधील मिरतमध्ये एका मुलीलासुद्धा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत ब्रिटनहून भारतात परतलेली आहे. आंध्र प्रदेशधील एक 47 वर्षीय महिला ब्रिटनहून दिल्ली विमानतळावर उतरली होती. ती मूळची उत्तर प्रदेशमधील आहे. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर तपासणी करणार्या कर्मचार्यांची नजर चुकवून ती पळून गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार विमातळातून पळ काढल्यानंतर ही महिला 22 डिसेंबर रोजी रेल्वेने विशाखापट्टनमला गेली. प्रवासादरम्यान तिने फोन बंद केला होता. त्यानंतर घरी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तिला ट्रॅक करून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच तिला विलगीकरणात ठेवले. नव्या कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग जास्त वेगाने होतो. या महिलेने विमानतळापासून रेल्वे स्टेशनपर्यंत केलेला प्रवास, त्या काळात तिच्या सानिध्यात आलेले लोक आणि दिल्ली ते हैदराबाद या 1800 किलोमीटरच्या प्रवासात तिच्याशी किती लोकांचा संपर्क आला, हे शोधणे आता मोठे आव्हान झाले आहे. तिच्याबरोबरच तिने इतरांच्या जीविताशीही खेळ केला. नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांनी खबरदारी घेणे सुरू केले आहे. आंध्र प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेथील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनहून परतेलेल्या 1,423 पैकी 1,406 नागरिकांना ट्रेस करण्यात आले आहे, तरी अजून दोनशे जणांचा शोध घ्यावा लागणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. गेल्या 15 दिवसांत ब्रिटनमधून पुण्यात काही नागरिक आले आहेत. त्यातील 109 नागरिकांचा येथील प्रशासन शोध घेत आहे. यापैकी काही नागरिकांच्या घराचा पत्ता प्रशासनाकडे आहे, तर काही प्रवाशी फोन उचलत नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करणे अवघड होऊन बसले आहे. ब्रिटनहून काही प्रवासी मुंबईला उतरले. त्यांनतर ते पुण्याला आले. कोरोना महामारीचा सामना करणार्या देशातील आरोग्य यंत्रणेसमोर आता आणखी एक गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेशातील मिरतमधील दोन वर्षांच्या मुलीला मंगळवारी या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. ब्रिटनमधून आलेल्या सर्व नागरिकांची जीनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. मंगळवारी दिल्लीमध्ये 14, कोलकाता जवळच्या कल्याणीमध्ये 7, पुण्यात 50 निमहंसमध्ये 15 व अन्य सहा अशा 107 सॅम्पलची तपासणी झाली. त्यामध्ये दिल्लीमध्ये आठ कोलकाता जवळच्या कल्याणीमध्ये एक, निमहंसमध्ये 2, पुणे येथे 7 आणि अन्य दोन लॅबमध्ये दोन जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांना याबाबत चुकीती माहिती दिली असावी. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात नव्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही, असे सांगितले असताना देशपातळीवरची जी आकडेवारी उपलब्ध आहे, त्यात मात्र महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या प्रजातीचे सात रुग्ण आढळल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारला जास्त सावध राहण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची घटलेली संख्या, कोरोनामुक्तांचे वाढलेले प्रमाण आणि मृत्यूंच्या संख्येत झालेली घट यामुळे आपण पाठ थोपटून घेत होतो. दररोज जिथे 16-17 हजार रुग्ण आढळायचे, तिथे आता दोन-तीन हजार रुग्ण आढळायला लागल्याने आपल्या कामाचे कौतुक करायलाच हवे;च परंतु त्याचबरोबर कोरोनावर अजूनही पूर्ण मात केलेली नाही, याचे भान ठेवून कोरोनाविषयक उपाययोजना करायला हव्यात. नागरिकांनीही बेजबाबदारीने वागून चालणार नाही. शिस्त, दंड, कारवाई यापेक्षा स्वयंशिस्त महत्वाची असून ती आपपल्याबरोबरच इतरांनाही सुरक्षित ठेवते.
ब्रिटनहून एका महिन्यात 33 हजार व्यक्ती भारतात परतल्या आहेत. त्यापैकी 114 व्यक्ती कोरोनाबाधित आहेत. या सर्व नागरिकांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर टेस्ट कऱण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा नवा घातक अवतार ब्रिटनमध्ये समोर आला होता. तेव्हापासून कोरोनाचा नवा अवतार 19 देशांमध्ये पसरला आहे. या विषाणूचा संक्रमणाचा वेग जास्त असल्यामुळे जगामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. सावधगिरी अजून वाढवणे, संसर्ग रोखणे, तपासणी वाढवणे आणि नमुन्यांना प्रयोगशाळेत पाठवणे या गोष्टींसाठी राज्यांना सतत मार्गदर्शन देणे सुरू आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या विषाणूची लक्षणे दिसली, तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच सध्या आपण करू शकतो. त्याव्यतिरिक्त सामाजिक अंतर भान ठेवणे, मुखपट्टी वापरणे, हात सॅनिटाइझ करणे आणि कोरोना ोखण्यासाठी केलेले इतर उपाय करत राहणे एवढेच आपल्या हातात आहे. एकिकडे देशात नव्या कोरोना विषाणूमुळे चिंता वाढली आहे, तर दुसरीकडे आता राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांची आकडेवारी पुन्हा वाढू लागली आहे. मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आता बेफिकीर राहून चालणार नाही. पूर्वीसारखेच सजग राहावे लागेल.