पुणे / प्रतिनिधीः पुण्यातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाने पिस्तूलने छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ...
पुणे / प्रतिनिधीः पुण्यातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाने पिस्तूलने छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिलिंद मराठे (वय-60) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. ते मराठे ज्वेलर्सचे मालक आहेत.
मराठे यांना नातेवाइकांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्यांच्या उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे लक्ष्मी रोडवरील मराठे ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठे यांचे शहरातील लक्ष्मी रोडवर मराठे ज्वेलर्स नावाने सराफ शॉप आहे. काल, मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता ते शॉपमध्ये होते. त्यांच्या केबिनमध्ये अचानक गोळी झाडल्याचा आवाज झाला. आवाज ऐकून शॉपमधील इतर कर्मचार्यांनी मराठे यांच्या केबिनकडे धाव घेतली. मराठे यांनी स्वत:च्या पिस्तूलमधून छातीत गोळी झाडल्याचे कर्मचार्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मराठे यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर विश्रामबाग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आर्थिक अडचण त्याचबरोबर कर्जबाजारीपणामुळे मराठे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मराठे यांनी छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला असावा, यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुणे पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.