आमदार रोहित पवारांनी वनविभागाला दिल्या सुचना ; गस्तीसाठी वाढवली वाहने जामखेड/प्रतिनिधी ः नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आमदार रोहित पवा...
आमदार रोहित पवारांनी वनविभागाला दिल्या सुचना ; गस्तीसाठी वाढवली वाहने
जामखेड/प्रतिनिधी ः नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आमदार रोहित पवारांनी वन विभागाच्या अधिकार्यांना सुचना दिल्या आहेत. आता कर्जत, जामखेड व करमाळा तालुक्यातील पोलीस व वनविभाग यंत्रणा बिबट्यास जेरबंद करण्यासाठी व प्रसंगी नरभक्षक असलेल्या बिबट्यास ठार करण्यासाठी कामाला लागली आहे.
लवकरात लवकर हा विषय मार्गी लागुन भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आ. रोहित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ज्या ठिकाणी बिबट्या दिसेल त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांना तात्काळ घटनास्थळी अधिक संख्येने जाता यावे म्हणून आमदार पवारांनी 4 वाहने उपलब्ध करून दिली आहेत. कर्जत, करमाळा, जामखेडच्या यंत्रणेकडून संयुक्तरित्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिकच्या गस्ती घालण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी बिबट्या प्रवनक्षेत्र आहे अशा ठिकाणी भयभीत नागरिकांसाठी वनविभागाच्या कर्मचार्यांकडून फटाकेही पुरवण्यात येत आहेत. कर्जत-जामखेडसाठी 40 हजार फटाके देण्यात येत आहेत. गस्ती घालण्यासाठी तालुक्यातील रेहकुरी आणि शेगुड या ठिकाणी वनविभागाच्या संबंधित अधिकार्यांना व कर्मचार्यांना आ. पवारांकडुन जेवणाची सोय करण्यात आली असून अधिक वेळ न दवडता पूर्ण वेळ ते याकामी देत आहेत. बिबट्याला पिंजर्यात पकडण्यात अडचणी येत असतील तर त्याला ठार मारण्याचे आदेश राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दिले असल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी दिली. गेल्या सहा दिवसांच्या कालखंडात करमाळा तालुक्यातील तीन जणांचा, तर आष्टी तालुक्यात तीन जणांचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. तरीही कुणीही अफवा न पसरवता खरी माहिती पोलिस व वनविभागाला कळवा, कुणावरही हल्ला होऊ नये यासाठी नागरिकांनी आपल्या जनावरांची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. सध्या ऊसतोडणीसाठी आलेली कुटुंबे कोप्यांमध्ये राहत आहेत. अशा ठिकाणी विजेच्या बल्बची संख्या वाढवून लक्ख प्रकाशाची व्यवस्था करावी,जिथे बिबट्या दिसेल तेथील नागरिकांनी तात्काळ पोलीस व वनविभागाला माहिती द्यावी म्हणजे तात्काळ उपाय योजना करता येईल.