$type=ticker$snippet=hide$cate=0

पाती लागली गळाया...!

  गेल्या दहा वर्षांत पश्‍चिम बंगालवर निर्विवाद वर्चस्व गाजविलेल्या तृणमूल काँग्रेसपुढं आता मात्र अस्तित्त्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आव्...

 



गेल्या दहा वर्षांत पश्‍चिम बंगालवर निर्विवाद वर्चस्व गाजविलेल्या तृणमूल काँग्रेसपुढं आता मात्र अस्तित्त्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आव्हान पेलणं अवघड झालं, की आक्रस्ताळेपणा वाढतो. चिडचिडेपणा येतो. त्यामुळं जिभेवर नियंत्रण राहत नाही. ही सारी लक्षणं आता ममतादीदींच्या बाबतीत दिसायला लागली आहेत. स्वकीय जेव्हा सोडून जातात, तेव्हा तर पायाखालची वाळूच सरकते. ममता दीदींचं आता तसं झालं आहे.

भारतीय जनता पक्ष आता अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींचा राहिलेला नाही. तो नरेंद्र मोदी-अमित शाह यांचा आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आहे. काँग्रेसचं आता भाजपपुढं आव्हान राहिलेलं नाही. प्रादेशिक पक्षच आता भाजपला आव्हान आहेत. देशावर एकछत्री कारभार असावा आणि त्यासाठी मार्गात जे जे अडथळे आहेत, ते दूर करण्यासाठी भाजप येन केन प्रकारेनं  प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतदीय जनता पक्षानं पश्‍चिम बंगालमध्ये पाळंमुळं रोवायला सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत पश्‍चिम बंगाल विधानसभेची निवडणूक जिंकायचीच असा निर्धार करून भाजप मैदानात उतरला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत 18 जागा जिंकल्यानं भाजपचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे जागा जिंकण्याचा संकल्प भाजपनं केला आहे. सुरुवातीला पश्‍चिम बंगालची भूमी भाजपला तेवढी सोपी नाही, असं सांगितलं जात होतं; परंतु आता ममता दीदींपुढं आव्हान उभं करण्यात भाजपला यश आलं. भाजप एकीकडं संघटनात्मक बळ वाढवित आहे,तर दुसरीकडं साम, दाम, दंड, भेद वापरून अन्य पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये आणीत आहे. लोकशाहीचा पुरस्कार करणार्‍या ममता दीदी डाव्यांप्रमाणंच आता एकाधिकारशाहीवर उतरल्या आहेत. अर्थात भाजपला तर एकाधिकारशाहीबाबत भलतं प्रेम आहे. भाजपच्या नेत्या, कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. त्यामुळं तृणमूल काँग्रेसविरोधात नाराजीची भावना पसरली आहे. डावे आणि काँग्रेस गलितगात्र झाल्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यात भाजपला यश येताना दिसतं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत 18 जागा जिंकलेल्या भाजपची धास्ती ममता दीदींनी घेतली असून त्याला तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर देताना त्या आक्रस्ताळेपणा करीत आहेत. ममता दीदी आणि त्यांचे भाचे अभिजीत बॅनर्जी यांच्याविरोधात पक्षात काहीसा नाराजीचा सूर आहे आणि तो कमी करण्याकडं त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यातून नाराज नेते भाजपच्या कच्छपि लागले आहेत.

 

गेल्या महिन्यातच तृणमूल काँग्रेसचे पाच खासदार आणि काही आमदार भाजपत जाणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यनंतर ममता दीदींनी काहींची समजूत काढण्यात यश मिळविलं असल्याचं सांगितलं गेलं; परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती, हे आता सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यातून स्पष्ट झालं आहे. अधिकारी हे ममता दीदींचे निकटवर्तीय होते. त्यांचा अनेक मतदारसंघात प्रभाव आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हाच त्यांची नाराजी जाणवली होती. त्यांची नाराजी दूर केली, असं तृणमूल काँग्रेस सांगत असताना आता विधानसभेच्या निवडणुकीला चार महिने राहिले असताना त्यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याचा अर्थ ते भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतरच अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. अधिकारी यांची समजूत घालण्याचे प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून केले जात होते; पण अधिकारी यांनी आपला निर्णय बदलला नाही. आता अधिकारी लवकरच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. अधिकारी बुधवारी  विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी पोहोचले, त्या वेळी विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी उपस्थित नव्हते. त्यामुळं अधिकारी यांनी विधानसभा सचिवांकडं आपला राजीनामा दिला. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना ई-मेल करून आपल्या राजीनाम्याची प्रत पाठवून दिली आहे. विधानसभेचे अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी अधिकारी यांचा राजीनामा आपण अद्याप स्वीकारला जाणार नसल्याचं म्हटलं आहे. नियमांनुसार, अधिकारी यांनी स्वतः अध्यक्षांकडे राजीनामा द्यावा लागेल, सचिवांना राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार नाही. कायदेशीर बाबी तपासूनच या विषयी निर्णय घेण्यात येईल, असं बॅनर्जी म्हणाले. हा तांत्रिक तपशीलाचा भाग झाला; परंतु आता अधिकारी यांनी परतीचे दोर कापले आहेत, हे स्पष्ट आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांनी वेगवेगळ्या सभा घेतल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी परस्परांवर नाव न घेता टीका केली. त्यानंतरच अधिकारी यांचा भाजप प्रवेश नक्की झाल्याचं मानलं जात होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्याची गांभीर्यानं दखल घेतली आहे. अभिजीत बॅनर्जी यांच्या मतदारसंघात झालेल्या प्रकाराला उत्तर देण्यासाठी शाह याच आठवड्यात मिदनापूरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्याअगोदर अधिकारी दिल्लीत जाऊन शाह यांची भेट घेतील. शाह यांच्या उपस्थितीत अधिकारी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. शाह यांच्या मिदनापूर येथील कार्यक्रमातील बदलामुळं तसे संकेत मिळत आहेत. अधिकारी यांना केंद्र सरकारनं दिलेली झेड प्लस सुरक्षा लक्षात घेता त्यांची वाटचाल कोणत्या दिशेनं आहे, हे लक्षात यायला हरकत नाही. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या प्रवेशाविरोधात आंदोलन करू शकणार नाहीत, अशी व्यवस्था भाजपनं तयार करून ठेवली आहे. तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं अधिकारी यांना जाण्यापासून रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु त्यांनी ऐकलं नाही. अधिकारी यांनी विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा 2006 मध्ये जिंकली. कांथी दक्षिण मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी तमलुक मतदारसंघातून विजय मिळवला. 2014 सालीही त्यांनी इथूनच विजय मिळवून आपली जागा राखली. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर त्यांना ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. त्यांच्याकडं परिवहन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. अधिकारी यांना सरकारमध्ये क्रमांक दोनचं नेता मानलं जात होते, तरीही ते नाराज का झाले, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. मिदनापूर परिसरात अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. त्यांच्या जाण्याचा फटका तृणमूल काँग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही. सुवेंदू यांचे वडील शिशीर अधिकारी 1982 मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. पुढं ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. सध्या ते कांथी लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. ते काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्रीही राहिलेले आहेत. सुवेंदू यांचे भाऊ दिब्येंदू तमलुक लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांचे आणखी एक भाऊ सौम्येंदू कांथी नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत. ही परिस्थिती पाहिली, तर हा सर्व गोतावळा आता भाजपत येण्याची शक्यता आहे. एरव्ही घराणेशाही आणि कौटुंबिक राजकारणाच्या नावानं गळा काढणारा भाजप अशा लोकांना मात्र पवित्र करून घेत आहे.

 

पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 16 जागांशिवाय पश्‍चिम मिदनापूर (18), बांकुडा (12) पुरूलिया (9), मुर्शिदाबाद (22) आणि मालदा (12) जिल्ह्यातील बहुतांश जागांवर अधिकारी कुटुंबीयांचा प्रभाव आहे. मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्यात पर्यवेक्षक म्हणून काम करत असताना सुवेंदू यांनी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना तृणमूलमध्ये आणलं होतं. त्यांच्या मदतीनं अनेक नगरपालिकांमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला. त्यामुळंच त्यांच्यासाठी भाजपनं जाळं टाकलं. तृणमूल काँग्रेसला सत्ता मिळण्यामध्ये नंदीग्राम आंदोलनाची महत्त्वाची भूमिका होती. या आंदोलनाचं नियोजन सुवेंदू अधिकारी यांनीच केलं होतं. 2007 मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी कम्युनिस्ट पक्षांच्या सरकारविरुद्ध स्थानिकांना एकत्रित केलं होतं. तृणमूल काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते सांगतात,की गेल्या काही काळापासून पक्षात उपेक्षा होत असल्यानं सुवेंदू नाराज होते. पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत आहे. विशेषतः मिदनापूर जिल्ह्यातील विषयांसंबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली नाही. तसंच ममता बॅनर्जी या पक्षात त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांना पुढं आणत आहेत. अभिषेक यांनाच पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून समोर आणलं जात आहे. याविषयी अधिकारी बंधूंमध्ये नाराजी आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर भाजपकडून पक्षात प्रवेश करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडणारे संधीसाधू आहेत, असंही त्या म्हणाल्या. पैशांच्या थैल्या खुल्या करून भाजप तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी येथे एका सभेत केला. तृणमूलचे प्रदेशाध्यक्ष सुव्रत बक्षी यांना भाजपच्या नेत्यांनी दूरध्वनी केला आणि पक्षात येण्याची गळ घातली यावरून भाजपच्या नेत्यांच्या उद्धटपणाची कल्पना येते. भाजपकडं कोणतीही विचारसरणी नाही, एकदोन संधीसाधू केवळ स्वत:च्या फायद्यासाठीच काम करीत आहेत, असं ममता म्हणाल्या असल्या, तरी त्या आतून धास्तावल्या आहेत, एवढं नक्की.

 


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5534,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9939,औरंगाबाद,354,क्रीडा,675,दखल,657,देश,4142,नाशिक,773,पुणे,583,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15308,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12389,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3428,विदेश,635,संपादकीय,1458,सातारा,3146,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पाती लागली गळाया...!
पाती लागली गळाया...!
https://lh3.googleusercontent.com/-jAhc4oyHYIk/X9uAinFhiEI/AAAAAAABmEo/82-FDJw9Z_8F__NG5eSM-G6U3JGSauUzwCLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-jAhc4oyHYIk/X9uAinFhiEI/AAAAAAABmEo/82-FDJw9Z_8F__NG5eSM-G6U3JGSauUzwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_273.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_273.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content