$type=ticker$snippet=hide$cate=0

संत वंचनं आम्हा निंद्य!

    संतांनी लोकांना अनेक वचनं, अभंगातून वागणुकीचे धडे दिले; परंतु आपण मात्र संत वचनापासून दूर जातो आहोत. संत वंचनं आम्हा निंद्य असं वागायचं ...

 


 संतांनी लोकांना अनेक वचनं, अभंगातून वागणुकीचे धडे दिले; परंतु आपण मात्र संत वचनापासून दूर जातो आहोत. संत वंचनं आम्हा निंद्य असं वागायचं आणि त्याचं समर्थन करायचं, हा जणू प्रघात झाला आहे. त्यातही राजकीय व्यक्ती तर बोलायचं एक आणि करायचं दुसरं असंच वागत असतात. त्याला कोणताही राजकीय पक्ष आणि राजकीय नेता अपवाद नसला, तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आताची कृती आणि त्यांची त्याअगोदरची उक्ती यात मोठा फरक आहे.

बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ्॥

अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ्॥

त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ्॥

तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ्॥

संताचं वागणं बोलणं तसं चालणं या प्रकारातील होतं. त्यापेक्षा त्यांचं वागणं आणि बोलणं यात कधीच अंतर पडायचं नाही.

त्यामुळं जो जसा बोलतो, तसं वागतो, असं वागणार्‍यांच्या पावलांना मी वंदन करतो, असं संत तुकाराम म्हणतात. याचा अर्थ उक्ती आणि कृती एकच असणारी पावलं देवाचीच असतात आणि ती वंदनीय असतात. केवळ तेवढ्यावरच संत तुकाराम थांबत नाहीत, तर असं वागणार्‍यांच्या घराचं अंगण मी स्वतःच्या अंगानं झाडीन, त्याचा दास बनून राहीन.

त्याच्या सेवेसाठी नेहमी त्याच्यासमोर हात जोडून उभा राहीन, असं संत तुकाराम म्हणतात. त्याचा व्यापक अर्थ घ्यायला हवा. चाले तैसा बोले असं प्रत्येकाचं वागणं असायला हवं. म्हणजे जशी ज्याची चाल, तसं त्याच वागणं. म्हणजे गाय बोललो आणि कसं वागायचं हे लक्षात ठेवण्याची गरज भासत नाही. जसं आपलं चालणं तेच आपलं बोलणं असेल, तर माझ्यासाठी तोच देव आहे आणि त्याच्या चरणीच माझा प्रेम भाव आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात, ते सार्थकी लागतं. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ असं म्हटलं जातं. याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे जो माणूस जे बोलतो, तसं वर्तन करतोच असं नाही. दुसर्‍याला सद्वर्तनाचा उपदेश करणारे लोक स्वत: तसं वर्तन करत नाहीत; मात्र काही लोक लोकांना जसा उपदेश करतात तसंच वागतात म्हणून संत तुकाराम महाराजांनी ‘बोले तैसा चाले’ असं म्हटलं आहे. यातला चाले हा शब्द पायांनी चालण्याशी संबंधित नाही, तर चाले याचा अर्थ चालचलणूक म्हणजे वागणं असा आहे; मात्र काही लोकांनी चाले याचा अर्थ पायांनी चालतो, असा करून काही श्‍लेष केले आहेत. जो जसा बोलतो, तसा चालतो, त्याच्यासाठी बोले तैैसा चाले अशी उक्ती विनोदानं वापरली जाते. दारूड्या माणूस अडखळत बोलतो आणि अडखळतच चालतो. म्हणजे जसा बोलतो तसाच चालतो. माणसाचं चालणं कसं असावं, हे त्याच्या मन:स्थितीवरून ठरतं. आनंदी माणूस पंजावर उड्या मारत चालतो. रागीट माणूस दणादण पाय आपटत चालतो. पायांची ही शैली त्याच्या मन:स्थितीचं दर्शन घडवतं. याचा उलटा अर्थ आपण घेऊ शकतो. पाय आपटत चालणारा माणूस रागात आहे, असं समजावं आणि उड्या मारत चालणारा माणूस आनंदात आहे असं समजावं.

संत तुकाराम महाराजांनी बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असं म्हटले आहे, याचा अर्थ जो जे बोलतो, तसेच तो वागतो. दुसर्‍या शब्दांत सांगायचं, तर उक्ती आणि कृतीत फरक नसलेली माणसं वंदनीय असतात. आज मात्र उलटंच होत आहे. जो जसा बोलतो, तसं वागत नाही, त्याचीच समाजात चलती आहे. कोणी त्याला धूर्त म्हणत असतील, कोणी त्याचा उल्लेख मुत्सद्दी असा करतील, तर कोणी  त्याला कात्रजचा घाट दाखविणं असं म्हणतील; परंतु सर्वांचा अर्थ एकच म्हणजे बोलण्याप्रमाणं न वागणार्‍यांची समाजात चलती आहे आणि बोलल्याप्रमाणं वागणार्‍यांची संख्या कमी झाल्यानं त्यांची मागासात गणना होत आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. ती जिंकण्यासाठी मोठ्या आवेशात काहीही बोललं गेलं; परंतु जे बोललं ते करा असं सांगितलं, तर त्याकडं तोंड फिरविलं जातं. मौन बाळगलं जातं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा असेच वाचाळ. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सहा जागा जिंकू. त्यातही पुण्याची जागा हमखास जिंकू, असं जाहीर करताना पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा जिंकली नाही, तर हिमालयात जाऊ, अशी भाषा वापरण्याइतपत त्यांचा आत्मविश्‍वास होता. या मतदारसंघाचं दोनदा प्रतिनिधित्त्व करूनही त्यांना आता अंदाज आला नाही. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झाला. हा पराभवही इतका मानहानीकारक होता, की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पन्नास हजारांहून अधिक मतांनी विजय मिळाला. खरंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांतदादांचं नाकच कापलं. सहापैकी पाच जागा गमावल्या. एक जागा जिंकली, तीही भाजपमुळं नव्हे, तर अमरीश पटेल या भाजपच्या उमेदवाराच्या व्यक्तिगत नियोजनामुळं. शब्दाचे पक्के असते, तर दादांनी एव्हाना झोळी घेऊन हिमालयात निघून जायला हवं होतं; परंतु तसं त्यांनी केलं नाही. राजकारणात जे बोललो, ते गांभीर्यानं घ्यायचे नसतं, असं नेते आणि जनतेलाही वाटायला लागलं आहे. गोपीनाथ मुंडे आणि गो. रा. खैरनार यांनी शरद पवार यांच्यावर गुन्हेगारांना आश्रय दिल्याचे बेफाम आरोप केले होते. ट्रकभर पुरावे देण्याची भाषा केली होती. त्यांच्या या आरोपाला भुलून जनतेनं पवार यांची सत्ता घालविली; परंतु सत्तेत आल्यानंतर शिवसेना-भाजपला पवार यांच्याविरोधातील आरोप सिद्ध करता आले नाही. उलट, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या म्हणण्यात पवार यांच्याविरोधातील आरोप निवडणूक प्रचाराचा भाग होता, असं सांगितलं. उलट, युतीच्या काळात एन्रॉन समुद्रात बुडविण्याची भाषा करण्यात आली होती; परंतु एन्रॉनला अलगद कसं तरंगत ठेवलं, हे जनतेनं पाहिलं. अर्थात नंतर एन्रॉन तिच्या कर्मानंच बुडाली, हा भाग वेगळा.

आणखी दोन महिन्यांनी ज्या घटनेला सात वर्षे पूर्ण होतील, त्या घटनेची आठवण केली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपण जे विरोधात होतो, तेव्हा जे बोललो, ते सत्तेत आल्यानंतर पूर्ण तर केलं नाहीच; उलट, त्याच्या नेमकं उलटं केलं. मोदी त्या वेळी पंतप्रधान नव्हते. तेव्हा ते फक्त पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. अहमदाबादमध्ये त्यांचा मेळावा झाला. इथे त्यांनी एक कविता वाचली - ’सौगंध में में माती की, मी देश विकायला देणार नाही.’ ही कविता प्रसून जोशी यांनी लिहिली आहे. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी आणि पंतप्रधान झाल्यानंतरही या कवितेची त्यांनी अनेक वेळा पुनरावृत्ती केली आहे. आज त्याच मोदी यांचं सरकार आहे आणि बहुतेक सरकारी कंपन्या त्यांच्या सरकारमध्ये विकल्या गेल्या. देशातील दुसर्‍या क्रमांकाची इंधन विक्रेत्या असलेल्या भारत पेट्रोलियमचा (बीपीसीएल) आता मोदी सरकार 53.3 टक्के हिस्सा विकणार आहे. या माध्यमातून सरकारला 40 हजार कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. मोदी सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात सरकारी कंपन्यांच्या शेअर्स किंवा समभागांची विक्री करून जेवढी रक्कम जमा केली, तेवढी रक्कम 23 वर्षांतसुद्धा जमा झालेली नाही. या संपूर्ण प्रक्रियेचं गोंडस नाव आहे, निर्गुंतवणूक. जेव्हा एखादी कंपनी किंवा संस्थेत पैसे गुंतवले जातात, तेव्हा तिला गुंतवणूक म्हणतात. जेव्हा सरकार आपला काही हिस्सा विकून सरकारी कंपनीकडून पैसे गोळा करते, तेव्हा या प्रक्रियेस निर्गुंतवणूक म्हणतात. निर्गुंतवणूक आणि खासगीकरण अनेकदा एकसारखंच गृहित धरलं जातं; पण या दोघांमध्ये मोठा फरक आहे. खासगीकरणात, सरकार आपल्या हिस्सेदारीच्या 51 टक्कयांपेक्षा जास्त हिस्सा एका खासगी कंपनीला विकते, तर फक्त थोडासा भाग निर्गुंतवणुकीत विकला जातो. निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेत, सरकार कंपनीची मालक राहते; परंतु खासगीकरणात शासकीय मालकी राहत नाही. निर्गुंतवणुकीचे बरेच फायदे आहेत. बर्‍याच सरकारी कंपन्या अशा आहेत, की कोट्यवधी रुपये खर्च करुनही नफा मिळत नाही. त्यामुळं सरकार अशा कंपन्यांकडील आपला हिस्सा किंवा शेअर्सची विक्री करते. जेणेकरून सरकार पैसे खर्च करणार नाही. सरकार देश चालवतं आणि देश चालविण्यासाठी पैशांची गरज असते. सरकारकडून ही रक्कम करांच्या माध्यमातून जमा केली जाते; परंतु या रकमेतून विकासकामं करता येणार नाहीत. यासाठी सरकार सरकारी कंपनीतील हिस्सा विकून पैसे उभारण्यासाठी निधी उभी करते. जेव्हा घरात खर्च ठेवणं कठीण होतं, तेव्हा लोक घरातील वस्तू विकतात. सरकारही असंच करतं. आता प्रश्‍न पडतो, की बीपीसीएलची हिस्सेदारी सरकार का विकत आहे? प्रत्यक्षात 2020-21 पर्यंत सरकारनं निर्गुंतवणुकीद्वारे दोन लाख दहा हजार कोटी रुपये उभे करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं; परंतु कोरोनामुळं आतापर्यंत सरकार केवळ 6,311 कोटी रुपये जमा करू शकली. त्यामुळं सरकारनं आता नफ्यातील कंपन्यांचा हिस्सा विकून मोकळं होऊन रक्कम जमा करण्याचा सपाटा लावला आहे. बीपीसीएलमार्फत सरकारला 40 हजार कोटी रुपये मिळणं अपेक्षित आहे. गेल्या चार वर्षांत बीपीसीएलचा नफा कमी कमी होत गेला. 2018-19 मध्ये बीपीसीएलचा नफा लात हजार 132 कोटी रुपये होता. गेल्या वर्षात तो घटून दोन हजार 683 कोटी रुपयांवर आला. मे 2014 मध्ये मोदी सरकार केंद्रात पहिल्यांदा सत्तेत आलं. त्यानंतर आतापर्यंत मोदी सरकारमध्ये 121 कंपन्यांची विक्री झाली आहे. यातून सरकारनं तीन लाख 36 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं आहे. ही आकडेवारी सरकारमधील निर्गुंतवणुकीद्वारे जमा झालेल्या निधीतील सर्वाधिक आहे. 1991 मध्ये जेव्हा देश आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करीत होता, तेव्हा सरकारनं सरकारी कंपन्यांमधील आपला वाटा विकून पैसे उभा करण्यासाठी निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या तीस वर्षात सरकारनं निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून चार लाख 89 हजार कोटींपेक्षा जास्त जमा केले आहेत. जास्तीत जास्त रक्कम मोदी सरकारच्या काळातच जमा झाली आहे.

 


Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5757,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,196,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,37,satara,138,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10315,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,704,देश,4433,नाशिक,805,पुणे,739,बीड,1437,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16401,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13637,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3696,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1548,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: संत वंचनं आम्हा निंद्य!
संत वंचनं आम्हा निंद्य!
https://lh3.googleusercontent.com/-DiM-JiTq6O0/X84vpCixMoI/AAAAAAABl_w/UJAsUMaZVI0gXATUAqm36S4w5FzSxexFwCLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-DiM-JiTq6O0/X84vpCixMoI/AAAAAAABl_w/UJAsUMaZVI0gXATUAqm36S4w5FzSxexFwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_283.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_283.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content