इस्लामपूर / प्रतिनिधी : पिंजरा सिनेमात मास्तरांनी एका मोहापायी शिक्षक असताना हाती तुणतुणे घेतले. तशीच मोहाची भुमिका विधानपरीषदेच्या आमदारकी...

इस्लामपूर / प्रतिनिधी : पिंजरा सिनेमात मास्तरांनी एका मोहापायी शिक्षक असताना हाती तुणतुणे घेतले. तशीच मोहाची भुमिका विधानपरीषदेच्या आमदारकीसाठी शेतकर्यांचे नेते म्हणवून घेणार्यांनी घेतली आहे, असा टोला लगावून अडत दलालांची वकिली करणार्यांना आम्ही जुमानत नाही. हिंमत असेल तर त्यांनी केलेले कायदे बदलून दाखवावेत. असा टोला आमदार आशिष शेलार यांनी माजी खा. राजू शेट्टींचे नाव न घेता मारला.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा व रयत क्रांती संघटना यांनी योजलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करणेत आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. पृथ्वीराज देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, मकरंद देशपांडे, माजी आ. सुरेश हळवणकर प्रमुख उपस्थित होते.
नवीन कायद्याने शेतकर्यांचे प्रश्न सुटणार असल्याने आडते, दलालांची बाजू घेणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष शेतकरी हिताच्या कायद्यास विरोध करत असल्याचा आरोप आ. आशिष शेलार यांनी केला. अदानी, अंबानी यांनी शेतकर्यांच्या हितास नख लावल्यास आमच्या हातात काठ्या असतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आ. शेलार म्हणाले, राजश्री शाहू, फुले, आंबेडकर यांना शेतकर्यांच्या विकासासाठी अभिप्रेत असलेले कृषी विषयक कायदे करुन शेतकर्यांना आर्थिक गुलामगीरीतून बाहेर काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. केंद्राचे कृषी विषयक कायदे हे महात्मा फुले यांच्या शेतकरी हिताच्या चिंतनाशी साधर्म्य साधणारे आहेत. राजर्षि शाहू महाराजांनी बाजारपेठा निर्मितीच्या तत्वाने पूढे नेणारा हा कायदा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजकालीन शेतकरी हिताविरोधी कायद्यास विरोध केला होता.
यशवंतराव चव्हाण यांनाही शेतीचे व्यापारीकरण होवून आडते, दलालांकडून शेतकर्यांची होणारी लूबाडणूक मान्य नव्हती अशा परिस्थितीत केवळ आडते, दलाल आणि राजकिय ठगांची मक्तेदारी संपुष्टात येणार असल्याने फुले, आंबेडकर, शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे पाईक म्हणवून घेणारे काँग्रेस आणि काँग्रेस धार्जिणे पक्ष केंद्राच्या कृषीविषयक कायद्यांना विरोध करीत आहेत.
ते म्हणाले, शेतकर्यांसाठी स्वातंत्र्यानंतरची दुसरी पहाट आहे. मोदींनी 95 हजार कोटी थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा केले. झोन बंदी ऊठवून शेतकर्यांच्या पायातल्या बेड्या नष्ट केल्या. झोन बंदी संपून एफआरपी लागू केल्याने ऊसाला दर मिळू लागला. आता ऊस वजनाच्या पावत्या त्वरीत मिळाव्यात यासाठीही तातडीने कायदा हवा, तरच काटामारी थांबेल. केंद्राचे कायदे शेतकरी हिताचे आहेत. आडते, दलाल नष्ट होणार आहेत.
व्यापारी, अडते, दलाल यांना शेतकर्याच्या दारी येवून जादा भाव देऊन माल खरेदी करावा लागणार असल्याने शेतकर्यांचे आर्थिक हित साधले जाणार आहे. किसान निर्भर यात्रा शेतकर्यांच्या स्वातंत्र्यास बळकटी देणारी आहे. कायद्यास विरोध करणार्यांची भावना अडते, दलाल यांचे समर्थन करणारी आहे.
आ. पडळकर म्हणाले, मेंढरांचे नेतृत्व लांडग्यांनी करावे अशा स्वरुपाचे राज्यातले सत्ताधारी पक्षांचे नेते आहेत. आ. सदाभाऊ खोत म्हणाले, किसान निर्भर यात्रा शेतकर्यांच्या बांधावर जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुके आणि तीन शहरात जावून कायद्यास समर्थन मिळवेल.
पहिले महायुध्द संपल्यानंतर सरकार ठरवेल तोच दर कायदा अंमलात आला. स्वातंत्र्यानंतरही तोच कायदा पूढे लागू राहिला. शेतकर्याने पिकविलेले अन्नधान्य रेशनवर आले. परंतू पेट्रोल, डिझेल, ट्रॅक्टर, कापड, औषधे आदी भांडवलदाराच्या वस्तू रेशनवर आल्या नाहीत. केंद्राने लागू केलेल्या कायद्यामुळे शेतीत गुंतवणूक होवून शेतमालास चांगला भाव मिळून शेतकरी सुखी होईल. 70 वर्षे काँग्रेसने देशाला लुटले. शेतकर्यांचे हित साधणारे नवे कायदे राहूल गांधींना समजणार नाहीत. शरद पवार नेहमी उलटे बोलतात, जे म्हणतात त्याच्या उलटे करतात, असा आरोपही त्यांनी केला. सुरेश हळवणकर म्हणाले, शेतकर्यांचे लुटारुच शेतकरी हिताआड येवून नव्या कायद्यास विरोध करीत आहेत.
यावेळी भाजप युमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहूल महाडीक म्हणाले, पूर्वी गोर्यांना हाकलून दिले आणि आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेतकर्यांच्या हिताच्या आड येणार्यांना हाकलून देण्याची वेळ आली आहे. भाजपचे नेते विक्रम पाटील, सम्राट महाडीक, रोहित पाटील, विकास पाटील, सागर खोत, सतिश महाडीक, कपिल ओसवाल, सभापती जगन्नाथ माळी, नगरसेवक अमित ओसवाल, विकास कुंभार, नानासो पाटील उपस्थित होती. डॉ. सचिन पाटील, गोरख पाटील, प्रभाकर शेवाळे, शशिकांत बेंद्रे, अरुण पाटील, तानाजी जगदाळे, वासू पाटील, निवास पाटील, चंद्रकांत पाटील, जितेंद्र सातपूते यांनी नियोजन केले.
अदानी, अंबानी आणि गांजाची शेती
महाविकास आघाडीचे नेते शेती अदानी, अंबानीच्या हाती जाईल असा प्रचार करतात. त्यांना जर गांजाची शेती पिकवायला परवानगी दिली तर ते शेती करायला येतील ना?... अशी मिश्किल टिप्पणी सदाभाऊ खोत यांनी केली.
पिंजरा सिनेमातील मास्तर पिंजरा सिनेमात मास्तरांनी एका मोहापायी शिक्षक असताना हाती तुणतुणे घेतले. तशीच मोहाची भुमिका विधान परीषदेच्या आमदारकीसाठी शेतकर्यांचे नेते म्हणवून घेणार्यांनी घेतली आहे, असा टोला लगावून अडत दलालांची वकिली करणार्यांना आम्ही जुमानत नाही. हिंमत असेल तर त्यांनी केलेले कायदे बदलून दाखवावेत, असा टोला आमदार आशिष शेलार यांनी माजी खा. राजू शेट्टींचे नाव न घेता लगावला.