अहमदनगर : भिंगार शहरात अकरा दिवसांपासून पाणी न सोडण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा शहर संघटक मतीन सैय्यद यांच्...
अहमदनगर : भिंगार शहरात अकरा दिवसांपासून पाणी न सोडण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा शहर संघटक मतीन सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली छावणी परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सात नगरसेवक व सीईओ यांच्या नावाचा दगड अशा आठ दगडांची पूजा करण्यात आली व नागरिकांना लवकरात लवकर पाणी रोज भेटावे असे साकडे घालण्यात आले. भिंगार शहराला दररोज पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देण्यात यावे, अन्यथा येत्या मंगळवारी भिंगार शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
भिंगार कँटोनमेंट हद्दीतील संपूर्ण भिंगार शहरात सुमारे अकरा दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळाले नाही. येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे तसेच पिण्याच्या पाण्याचे टँकर हे मोजक्या ठिकाणीच येतात. त्यातून ठराविक ठिकाणी पाणीवाटप केले जाते. नगरसेवक सांगेल तेथे पाणी वाटप केले जाते, असे निदर्शनास आणून नगरसेवक त्यांच्या खिशातून पैसे देतात का, असा सवाल त्यांनी केला. टँकरचे पैसेसुद्धा नागरिकांकडून वसूल केले जातात. तर नगरसेवक सांगेल तेथेच का पाणी पुरवले जाते, अशी विचारणा सय्यद यांनी केली.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील कूपनलिका नादुरुस्त झाल्या असून त्यामुळे पाण्याचा पर्यायी स्त्रोतही बंद झाला आहे. त्यामुळे लोकांची व महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. छावणी परिषदेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता पैसे नाहीत, निविदा निघालेल्या नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे नागरिकांना दिली जातात. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी संभाजी भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, ईश्वर भंडारी, इब्राहिम चौधरी, निसार शेख, आसिफ शेख, मदिना शेख, नूरजहॉ शेख, गुलनाज सय्यद, अनुराधा भंडारी, शोभा भंडारी, ज्योती देवतरसे, सुशीला देवतरसे, राणी विधाते, कुसुम वागस्कर, नलिनी भिंगारदिवे, सुंदर भिंगारदिवे, सरिता पंडित, रोहिणी पंडित, नासिर शेख, स्वप्निल पवार, हाजी आरिफ, अन्सार सय्यद, जाफर शेख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.