नवीदिल्लीः भारतातील कोरोना साथीच्या आजाराचा सर्वांत वाईट टप्पा संपला आहे. जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात भारत आपल्या नागरिकांना कोरोनाची लस...
नवीदिल्लीः भारतातील कोरोना साथीच्या आजाराचा सर्वांत वाईट टप्पा संपला आहे. जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात भारत आपल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्याच्या स्थितीत असेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.
ते म्हणाले, की मला वैयक्तिकरित्या असे वाटते, की लसीचा पहिला डोस जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात दिला जाईल. आम्ही या स्थितीत पोहोचलो आहोत. तथापि, आमची पहिली प्राथमिकता ही लस सुरक्षित आणि प्रभावी असणे आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे तडजोड करू शकत नाही. ’ आमचा पुनर्प्राप्ती दर जगातील सर्वोत्तम आहे काही महिन्यांपूर्वी देशात कोरोनाची दहा लाख सक्रिय प्रकरणे होती, ती आता जवळपास तीन लाखांवर आली आहेत. संसर्गाची एक कोटी प्रकरणे झाली आहेत. यापैकी 95 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आमचा पुनर्प्राप्ती दर जगात सर्वाधिक आहे. मला वाटते, की आपण समस्यांवर मात केली. आता शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. इतका मोठा देश असूनही आम्ही इतर मोठ्या देशांपेक्षा चांगल्या स्थितीत आहोत. गेल्या 24 तासांत केवळ 1460 सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली. गेल्या 22 दिवसातील ही सर्वात कमी घटना आहेत.
लसीच्या प्राधान्यक्रमाबाबत आरोग्यमंत्री म्हणाले, की भारत सरकार गेल्या चार महिन्यांपासून राज्य सरकारांच्या सहकार्याने राज्य, जिल्हा व गटस्तरावर लसीकरणाची तयारी करीत आहे. 260 जिल्ह्यांत 20 हजार आरोग्य कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जर कुणाला लस घ्यावयाची नसेल, तर त्यांच्यावर दबाव आणला जाणार नाही. पोलिओ आणि कोरोना हे वेगवेगळे आजार आहेत. पोलिओचे निर्मूलन करणे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य होते. अखेरीस कोरोना विषाणूचे प्रमाणदेखील कमी होईल आणि काही तुरळक प्रकरणे समोर येतील.