विटा / प्रतिनिधी : विट्यात गावठी बनावटीचे पिस्तुल व त्याच्या गोळ्या (राऊंड) विक्रीसाठी आलेल्या सचिन बापूसो चव्हाण (वय 35) आणि अजित दुर्योध...
विटा / प्रतिनिधी : विट्यात गावठी बनावटीचे पिस्तुल व त्याच्या गोळ्या (राऊंड) विक्रीसाठी आलेल्या सचिन बापूसो चव्हाण (वय 35) आणि अजित दुर्योधन चव्हाण (वय 34) या दोघांना स्थानिक पोलिसांनी रंगेहात पकडले. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. दोघेही विहापूर (ता. कडेगाव) येथील आहेत. सध्या खानापूर तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकी जाहीर झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विटा पोलिसांनी अवैधरित्या चालणारी शस्त्रांची तस्करी तसेच विना परवाना, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणार्यांवर कारवाई सुरू आहे.
सोमवारी रात्री विटा तासगाव रस्त्यावरील एस्सार पेट्रोल पंपाजवळ दोघेजण गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी पथकासह सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले. दोघांकडून एक गावठी मॅगझीन असलेले पिस्टल अंदाजे किंमत रुपये तीस हजार व जिवंत 2 राऊंड अंदाजे किंमत 1000 रुपये आणि 60 हजार रुपयांची हिरो होंडा मोटार सायकल जप्त केली.
या दोघांविरुध्द भारतीय आर्म्स ऍक्ट 1959 चे कलम 3, 5, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिस निरिक्षक रवींद्र शेळके यांच्यासह हवालदार विक्रम भिंगारदेवे, रवींद्र गायकवाड, अतुल यादव, शिवाजी पाटील, सूरज देवकाते, शंकर कुंभार, कॅप्टनसाहेब गुंडवडे आदींनी सहभाग घेतला.