औरंगाबाद खंडपीठाचे आदेश जवळ्यातील सावकारी प्रकरण पारनेर/प्रतिनिधी ः जवळा तालुका पारनेर येथील एका महिलेकडून बारा हजाराचे 95 हजार रुपये वसुल...
औरंगाबाद खंडपीठाचे आदेश जवळ्यातील सावकारी प्रकरण
पारनेर/प्रतिनिधी ः जवळा तालुका पारनेर येथील एका महिलेकडून बारा हजाराचे 95 हजार रुपये वसुल करणारे दांम्पत्य प्रकाश हरिभाऊ कोठावळे व शिला प्रकाश कोठावळे यांच्या विरुद्ध सहकार विभागाने बेकायदेशीर सावकारी केल्या गुन्हा जुन महिन्यात दाखल झाला होता. याप्रकरणी पुढे जामीन मिळाल्यानंतर हा गुन्हा खोटा असल्याचा दावा करुन, तो रद्द करण्यासाठी कोठावळे दाम्ंपत्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील संभाषणाचे कॉल रेकॉडिग मागविली आहे.
या याचिकेवर खंडपीठातील न्यायमुर्ती टी.व्ही. नलावडे व एम. जी. शेवळीकर यांच्यासमोर सुनावनी झाली. सहकार विभागाने या प्रकरणातील सावकाराच्या घरावर छापा मारल्यानंतर तो व्याजाचा धंदा करत असल्याची काहीही कागदपत्रे व आक्षेपार्ह पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे हा गुन्हा खोटा असून तो रद्द होण्यास पात्र असल्याचा युक्तीवाद सावकाराचे वकील अमोल गवळी केला. त्यानंतर हा गुन्हा कशाच्या आधारे तुम्ही दाखल करून घेतला असा सवाल न्यायालयाने पोलिसांसह सहकार विभागाला विचारला. त्यावर पिडीत महिला व सावकार दाम्पत्य यांच्यातील संभाषणाची ध्वनीचित्रफित उपलब्ध असून त्यामध्ये सावकार दाम्पत्य व्याजाचा धंदा करत असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. त्यावरुन हा गुन्हा दाखल केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्या ध्वनिचित्रफितीचे भाषांतर (लेखी रूपांतर) करून पुढील तारखेला न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावनी अकरा जानेवारीला होणार आहे. अॅड. अरविंद अंबेटकर पिडीत महिलेची बाजु न्यायालयात मांडत आहेत.