आ. सदाभाऊ खोत यांचा विरोधकांना सवाल: ऊसदरावर शेट्टी गप्प का ? इस्लामपूर / प्रतिनिधी : माझी जयंत पाटलांशी सेटलमेंट आहे; मी त्यांच्यावर...
आ. सदाभाऊ खोत यांचा विरोधकांना सवाल: ऊसदरावर शेट्टी गप्प का ?
इस्लामपूर / प्रतिनिधी : माझी जयंत पाटलांशी सेटलमेंट आहे; मी त्यांच्यावर काय बोलत नाहीत असे म्हणणारे लोक कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसणार्या राजू शेट्टीवर का बोलत नाहीत. मग ऊस दराचा प्रश्न सुटला काय? असे शेतकर्यांनी समजायचे काय, असा सवाल माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत केला.
आ. खोत म्हणाले, माझ्यावर बोलणार्यांचीही शेट्टींशी सेटलमेंट आहे काय? एफआरपीचे तुकडे होत असताना कारखानदारांशी सलगी करणारे शेट्टी गप्पच आहेत. त्यांच्यावर हे लोक काहीच बोलत नाहीत. मात्र, माझा व माझ्या कुटुंबाचा काहीच संबंध नसताना कडकनाथ प्रकरणी आमच्यावर खोटे आरोप करुन आम्हाला बदनाम करीत आहेत. अशा लोकांना आता आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देवू. आमच्या विरोधात पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे, असे आव्हान आ. खोत यांनी दिले.
ते म्हणाले, किसान आत्मनिर्भर यात्रेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या बांधावर जावुुन त्यांच्या समस्या जाणून घेण्याची संधी मिळाळी. कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे ही यात्रा व सांगता सभा यशस्वी झाली. इस्लामपूर पालिकेची निवडणूक रयत क्रांती संघटना समविचारी पक्षांसी युती करुन लढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. सागर खोत, नंदकुमार पाटील, अतुल पाटील, मोहसीन मुल्ला, सुनिल जवादे, सर्फराज ढाके आदी यावेळी उपस्थित होते.