संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा ; दोन महिन्यानंतरही शेतकरी ऊसाच्या पैश्यापासून वंचित श्रीगोंदे ः श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे, जगताप आणि स...
संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा ; दोन महिन्यानंतरही शेतकरी ऊसाच्या पैश्यापासून वंचित
श्रीगोंदे ः श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे, जगताप आणि साजन शुगर दैवदैठण हे तिनही कारखाने पूर्ण क्षमतेने चालू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लाटला आहे. नियमानुसार ऊस तोडणी नंतर पंधरा दिवसांत ऊसाचे एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही श्रीगोंदा तालुक्यातील व नगर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने यांनी अजूनही ऊसाचे पेमेंट दिलेले नाही.
ऊसाचे पेमेंट द्या, अन्यथा आंदोलन करु असा इशारा, संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील सर्वच सहकारी, खासगी कारखाने यांकडे करोडो रुपये थकले आहेत. जगताप(कुकडी) कारखाना व साईकृपा हिरडगाव यांची आरआरसीची कारवाई करण्यात आली होती मात्र, त्यावर पुढे जप्तीची कारवाई करण्यात आली नाही. यावर्षीच्या चालू गळीत हंगामापूर्वी जुने देणे व व्याज देणे गरजेचे होते, मात्र ते सुद्धा अजून दिले गेले नाही. कुकडी सहकारी(जगताप)कारखान्याकडून मागील हंगामाची 500 रुपये प्रति टन अशी अनेक शेतकर्यांची थकबाकी येणे आहे. शेतकरी मेटाकुटीला आले तरी माजी आमदार राहुल जगताप(चेअरमन) याच्यांकडून करोडो रुपये येणे आहे. तसेच माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुत्र व कुटुंबिय यांच्या मालकीच्या साईकृपा हिरडगाव कारखाना यांकडून अजून ही शेतकर्यांचे व वाहतुकदारांचे थकीत पेमेंट येणे आहे. या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. तरीही या चालू गळीत हंगामातील बाकी अजून मिळाली नाही. त्यामुळे 11.12.2020 रोजी प्रादेशिक साखर सहसंचालक अहमदनगर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. मागील वर्षी टिळक भोस व त्यांच्या सहकारी यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानासमोर 90 दिवस ठिय्या आंदोलन केले होते. तसेच अनेक दिवसांपासून थकीत पेमेंट साठी सातत्याने पाठपुरावा देखील केला होता. तालुक्यातील प्रमुख नेते असलेल्या पाचपुते जगताप नागवडे कारखाने यांकडील थकीत पेमेंट मुळे तालुक्यातील शेतकरी मेटेकुटीला आला आहे हे मात्र खरे. यंदा अतिरिक्त ऊस उत्पादन मुळे शेतकरी उघडपणे बोलत नसला तरी देखील कारखंदारांवर नाराज असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम नागवडे-जगताप या साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीवर नक्की होऊ शकतो.