पुणे / प्रतिनिधीः मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रविवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्राम...
पुणे / प्रतिनिधीः मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रविवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही राज्याभर पाऊस कोसळणार असून अनेक ठिकाणी थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई-विरार, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढचे तीन-चार तास असाच पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढच्या 24 तासांत मुंबई, पुण्यासह नागपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले असून अनेक उपनगरांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. नवी मुंबईमध्येही रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी कामाला जाणार्यांना कोरोनाच्या संकटात आणखी त्रास सहन करावा लागला.
वसई-विरार नालासोपार्यात सलग तिसर्या दिवशी रिमझिम पावसाच्या सरी सुरू होत्या. आभाळ पूर्णपणे भरलेले असून हवेत प्रचंड गारवा पसरला आहे. भिवंडीतही पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू होाता. या अवकाळी रिमझिम पावसाने साथीचे आजार बाळावण्याची शक्यता वाढली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील हवानात अचानक बदल झाला आहे. पनवेल, नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाच्या सरी पडल्या. नगरमध्येही सडा टाकल्यासारखे काही थेंब येऊन गेले.
पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही सकाळी सात वाजल्यापासून पालघर शहरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हवेत गारवा पसरला आहे. या अवकाळी पावसाचा फटका दुबार पीक घेणार्या शेतकर्यांना बसला आहे.