जग 21 व्या शतकात असलं, तरी अजूनही मध्ययुगीन काळात आपला समाज वावरतो आहे. भारतातच नाही, तर जगभरात अशा अनेक सामाजिक कुप्रथा सुरू आहेत. त्यांच...
जग 21 व्या शतकात असलं, तरी अजूनही मध्ययुगीन काळात आपला समाज वावरतो आहे. भारतातच नाही, तर जगभरात अशा अनेक सामाजिक कुप्रथा सुरू आहेत. त्यांच्याविरोधात आवाज उठविला जात असला,तरी तो आवाज क्षीण आहे. भारतात पुरोगामी विचारांच्या चळवळींनी अशा कुप्रथा नष्ट करण्याची मोहीम उघडली आहे. या मोहिमा राबवणार्यांना अडथळ्यांच्या शर्यतीला सामोरं जावं लागत असलं, तरी त्यांच्या प्रयत्नांना कमी लेखता येणार नाहीत.
युवकच क्रांती घडवू शकतात, हे जगभरातील अनेक क्रात्यांनी दाखवून दिलं आहे. जुनी पिढी आणि नव्या पिढीत वैचारिक दरी असते. जुन्या, कालबाह्य घटकांना, मध्ययुगीन कुप्रथांना मागासलेले काही समाजघटक अजूनही चिकटून राहत असतात. भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांत अजूनही कौमार्य चाचणीची प्रथा सुरू आहे. उच्चशिक्षित आणि समाजात मान असलेलेच जेव्हा या कुप्रथेच्या परंपरेतून बाहेर पडण्याचं धाडस दाखवित नाहीत, तेव्हा अन्य घटकांचं काय हा प्रश्न उरतोच. भारतात ही कुप्रथा वेगवेगळ्या राज्यांत आहे आणि त्यावरून स्त्रीचं चारित्र्य ठरविलं जातं. विवाहाच्या पहिल्याच रात्री नवदांपत्याची इच्छा असो, की नसो; त्यांना शरीरसंबंध करायला भाग पाडायचं, त्या वेळी समाजातील काहींनी गाव जमवल्यासारखं जमून नवदांपत्याच्या खोलीबाहेर रात्र काढायची आणि शरीरसंबंध संपल्यानंतर बेडशीटवर रक्ताचे डाग पडले, की नाही, हे पाहायचं, अशी ही कुप्रथा आहे. त्या वेळी अशा नवविवाहितेची काय मानसिकता होत असेल, याचा विचार कुणीच करीत नाहीत. तिला मेल्याहून मेल्यासारखं होत असेल. जॉर्जिया, कॉकशस, अझरबैजानसह अनेक देशांत ही कौमार्य चाचणीची प्रथा सुरू आहे. ’कौमार्य चाचणी’ त नववधू पास झाली नाही, तर नाणं खोटं आहे, असं सांगून तिला माहेरी पाठविलं जातं. नंतर तिच्याशी कोणीही विवाह करायला तयार होत नाही. आयुष्यभर अपमानित जीणं तिला जगावं लागतं. अलिकडच्या काळात मुली अनेक कामं करतात. शारीरिक कामांमुळं, स्पर्धा परीक्षांच्या तयारीमुळं, मानसिक ताण-तणावामुळं कधी कधी अगोदरच रक्तपात झालेला असतो. त्यामुळं विवाहाच्या रात्री शरीरसंबंध करूनही रक्त येत नाही. वैद्यकीय तज्ज्ञ त्याला दुजोरा देतात. या पार्श्वभूमीवर अशा क्रूर आणि अनिष्ट प्रथा यापुढं ’लैंगिक अत्याचार’ समजला जाणार आहे, अशी घोषणा राज्य सरकारनं केली. त्याला दोन वर्षे झाली असली, तरी महाराष्ट्रात कंजारभाट समाजात अशा कुप्रथा पुढंही सुरू आहेत. दर दोन महिन्यांनी सर्व जिल्ह्यांत अशा प्रकारच्या महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा पाठपुरावा केला जाणार आहे, असं त्या वेळी सांगण्यात आलं असलं, तरी ज्या पद्धतीनं अजूनही पुण्यासह राज्यातील अनेक भागांत नवविवाहितेला पहिल्याच दिवशी कौमार्य चाचणीला सामोरं जावं लागतं, त्यावरून कायद्याचा धाक राहिलेला नाही, असं दिसतं. बलात्कारित महिलेची कौमार्य चाचणी करण्यावरही राज्य सरकारनं बंदी घातली आहे. किंबहुना, वैद्यकीय अभ्यासक्रमातूनही कौमार्य चाचणीचा भाग वगळण्यात आला आहे. सरकार योग्य पावलं उचलत असलं, तरी त्यासाठी समाजानं आता पुढं येण्याची आवश्यकता आहे.
पुण्यातील एका माजी नगरसेवकाच्या मुलाचं लग्न एका निवृत्त पोलिस अधिकार्याच्या मुलीशी झालं. एक राजकीय नेता, तर दुसरा पोलिस अधिकारी. कायद्याचे जाणकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे दोन्ही घटक. विशेष म्हणजे वधू आणि वर दोघंही उच्चशिक्षित. नवर्या मुलानं लंडनहून आपलं शिक्षण पूर्ण केलं. असं असतानादेखील त्यांचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर जातपंचायतीच्या दबावाला बळी पडून मुलीची कौमार्य चाचणी करण्यात आली होती. सामाजिक बहिष्काराच्या भीतीनं एवढ्या मोठ्या उच्चशिक्षितांना कुप्रथा मोडीत काढण्यात अपयश येत असेल, तर वाड्या-वस्त्यांवर, गावात राहून कंजारभाट समाजातील अशिक्षित लोक अशा कुप्रथांसाठी ी किती आग्रही असतील, याचा विचारच न केलेला बरा. कंजारभाट समाजात लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची कौमार्य चाचणी करण्याची कुप्रथा अजूनही सुरू असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या कुप्रथेतून महिलांचं शोषण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या रात्री तरुण-तरुणीच्या शरीरसंबंधामध्ये पांढर्या कपड्यावर रक्ताचा डाग न पडल्यास तरुणी या टेस्टमध्ये ’नापास’ ठरते. तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला पंचांसमोर कपडे उतरवणं, शरीराच्या नाजूक भागांना चटके देणं, उकळत्या तेलातून नाणं बाहेर काढणं असे अनेक पद्धतीचे अमानवीय दंड दिले जातात. काळ बदलला तरीही कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणी परीक्षा मात्र सुरू आहे. आता मात्र कंजारभाट समाजातील या अनिष्ट प्रथेला धक्का देण्याचं काम याच समाजातील काही तरुणांनी सुरू केलं आहे. मनातील भीती, दडपण मागं सारून काही धाडसी मुलींनीही कौमार्य परीक्षा देणार नाही, असं सांगत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी असे तीन विवाह झाले असून मंगळवारीही असा एक विवाह सोहळा पार पडला. कंजारभाट समाजात आता काही तरुण पुरोगामी भूमिका घेऊन कुप्रथांविरोधात आवाज उठवायला लागले आहेत. पुण्यातील प्रियंका इंद्रेकर हिचा विवाह अंबरनाथ येथील धनंजय तमायचीकर यांच्यासोबत झाला. या विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवरही कंजारभाट समाजातील या अनिष्ट प्रथेविरोधातील मोहिमेला बळ द्यावं, अशी विनंती केली होती. वधू-वराच्या या निर्णयाचं स्वागत करताना धनंजयाचा भाऊ विवेक यानं, आजही समाजामध्ये छुप्या स्वरूपात ही प्रथा काही ठिकाणी सुरू असल्याचं मान्य केलं; मात्र हे प्रकार पूर्णपणे थांबायलाच हवेत. हा व्यक्तीस्वातंत्र्यावर, खासगीपणावर गदा आणण्याचा प्रकार आहे, असं म्हटलं आहे. वयात येणार्या आताच्या मुलामुलींनाही हा प्रकार गैर असल्याचं लक्षात आलं आहे. प्रियंकाच्या वडिलांनी 1996मध्ये या प्रथेला विरोध करून नोंदणी पद्धतीनं विवाह केला होता. त्याकाळी सामाजिक बहिष्काराचा दाह अधिक होता, तरीही त्यांनी ते धाडस दाखवलं. समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर आता तरुणांनीच पुढाकार घेऊन अशा अनिष्ट रुढी-परंपरांना चाप लावायला हवा.
उदरनिर्वाहासाठी भटकत असताना गटातल्या स्त्रीला बंधनात ठेवण्यासाठी कौमार्य चाचणीचा आधार घेण्यात आला; मात्र त्याविरोधात ’स्टॉप दी व्ही रिच्युअल’ ही मोहीम विवेक तमायचीकर आणि काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केली. विवेक आणि ऐश्वर्या यांनी स्वतःही लग्नामध्ये कौमार्य परीक्षा न देता हा पायंडा मोडून काढला. विवाह, लैंगिकता, परस्पर विश्वास या सगळ्या पती-पत्नीमधल्या वैयक्तिक बाबी आहेत. सर्वोच्च न्यायालयानं ’राइट टू प्रायव्हसी’चा मुद्यावर भाष्य केलं आहे. त्या आधारे या अनिष्ट प्रथेविरोधात सोशल मीडियामधून ’स्टॉप व्ही टेस्ट’ हे अभियान सुरू करण्यात आलं. या मोहिमेला पाठिंबा देणार्या युवकांना या जोखडातून मुक्त व्हायचं आहे, असं विवेक सांगतात. त्याच्या मित्रांना मारहाण झाली. का तर ते जातपंचायतीच्या विरोधात बोलले म्हणून. कंजारभाट समाजातले जे-जे विरोधात बोलतात, त्यांना मारहाण केली जाते, जातीच्या बाहेर काढलं जातं. सामाजिक बहिष्कार टाकला जातो. काही तरुणांनी ’ स्टॉप द व्ही रिच्युअल हे अभियान सुरू केल्यानं महाराष्ट्रातल्या जातपंचायतीसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चळवळीवर दबाव आणण्यासाठी समाजातल्या लोकांची माथी भडकवण्याचा प्रकार सुरू झाला असला, तरी आता सुशिक्षित तरुणांना या कुप्रथा मान्य नाहीत. त्याविरोधात ते संघटित होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. स्टॉप द व्ही रिच्युअल चळवळीतल्या सदस्यांवर मानहानीचे गुन्हे दाखल करणं आणि वेळप्रसंगी स्त्रियांनी विनयभंगाचे गुन्हे दाखल करणं, असे प्रकार सुरू झाले असताना कुप्रथांविरोधात चळवळीला काही लोक तरी पाठिंबा देऊन विवाहानंतर कौमार्य चाचणी करण्याचं टाळतात, हे सामाजिक सुधारणेचं पाऊल आहे. चळवळीतल्या अनेकांना बहिष्कृत केल्याचा अनुभव येतो आहे.