पुणे / प्रतिनिधी: पुण्याच्या जुन्नर तालुक्यात अंधश्रद्धेच्या एका घटनेने अक्षरशः कळस गाठला आहे. एका वृद्ध महिलेच्या शेतातील कांद्याची रोपे वा...
पुणे / प्रतिनिधी: पुण्याच्या जुन्नर तालुक्यात अंधश्रद्धेच्या एका घटनेने अक्षरशः कळस गाठला आहे. एका वृद्ध महिलेच्या शेतातील कांद्याची रोपे वाढू नयेत, म्हणून अज्ञातांनी अघोरीपणा केला आहे. डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात हा धक्कादायक प्रकार सतत घडत होता.
हिराबाई फुलवडे या वृद्ध महिलेच्या शेतात ही धक्कादायक घटना घडली आहे. शेतात काळी बाहुली, नकली मंगळसूत्र, लिंबू, अंडी, नारळ, हळद-कुंकू उतरवून टाकली होती. सोबतच एका कागदावर ओम करणी कराय, करणे देवाय नमः, ओम उध्वस्ताय नमः सह अन्य आशय नमूद आहे. या अज्ञाताचा कहर इथेच थांबला नाही, तर त्यांनी तणनाशक फवारून कांद्याच्या रोपांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. हिराबाईंचा एक पुरुष आणि एका महिलेवर संशय आहे. त्यांनी तशी तक्रार नारायणगाव पोलिसांत दिली आहे. तक्रारीत पाईपलाईनचे नुकसान करण्यात आल्याचे ही म्हटले आहे. पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कांदळी गावात हिराबाईंची शेती असून ती बालाजी राखोंडेना वाट्याने दिलेली आहे. याच वाटेकर्याच्या निदर्शनास पहिल्या दिवशी लिंबू, टाचण्या, काळी बाहुली आणि हळद-कुंकू नजरेस पडले. त्यानंतर नकली मंगळसूत्र, अंडी, नारळ आणि सोबत एक कागद आढळला. त्या कागदावर ओम करणी कराय, करणे देवाय नमः, ओम उध्वस्ताय नमः सह अन्य आशय नमूद आहे. तंत्र-मंत्राचा हा प्रकार हाणून पाडण्यासाठी वाटेकरीने रात्री गस्त घालायला सुरुवात केली, तेव्हा रात्री बाराच्या सुमारास एक पुरुष आणि एक महिला शेतात दिसून आली. सोबत पूजेचे साहित्य ही होते. तेव्हा बालाजी यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी मारहाण करून पळ काढला. दोघांचेही तोंड कापडाने बांधलेली होते. या दोघांनी शेतातील कांद्याच्या रोपांवर तणनाशक फवारून, कांद्याच्या रोपांचे नुकसान केले, तर पाण्याच्या तीन बारी तोडून तेथे दगड-माती भरलेली आढळली आहेत. तंत्र-मंत्राचा हा अघोरीपणा वृद्ध महिलेला वेदना देणारा ठरला आहे.. यामागे नेमके कोण आहे? हे समोर यावे, म्हणून त्यांनी नारायणगाव पोलिस आणि महात्मा गांधी तंटामुक्ती समितीकडे रीतसर तक्रार केली आहे. पूर्वीच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे; मात्र अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.