दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्यातील मलवडी येथील श्री खंडोबाचा शुक्रवार, दि. 25 रोजी होणारा रथोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्...
दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्यातील मलवडी येथील श्री खंडोबाचा शुक्रवार, दि. 25 रोजी होणारा रथोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 25, 26 व 27 डिसेंबर रोजी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. या काळात कोणीही मलवडी येथे येऊ नये, असे ग्रामपंचायतीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
श्री खंडोबाची यात्रा प्राचीन व गाजलेली आहे. श्री खंडोबा व श्री महालक्ष्मीच्या रथांची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येते. यात्रेस रथोत्सवादिवशी लाखो भाविकांची उपस्थिती असते. सध्या प्रशासनाच्या निर्णयानुसार धार्मिक स्थळे उघडण्यास व धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, रथ मिरवणूक, पालखी सोहळे काढण्यास प्रशासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे यंदा यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मानकरी व पुजारी हे प्रशासनाच्या देखरेखीखाली करणार आहेत. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथाची मिरवणूक काढण्यात येणार नाही.
मलवडी गावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मागील रविवारी मलवडीचा आठवडा बाजार रद्द करण्यात आला होता. तसेच यात्रा कालावधीत होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायत मलवडी व श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान ट्रस्ट यांनी 25, 26 व 27 डिसेंबर रोजी संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला. दर्शनासाठी मंदिरही बंद ठेवण्यात येणार असल्याने कोणीही मलवडी येथे येऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. स.पो.नि. राजकुमार भुजबळ यांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्यांविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.