नागठाणे / वार्ताहर : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्या संशयित युवकास बोरगाव पोलिसांनी कर्नाटक राज्यातून अटक ...
नागठाणे / वार्ताहर : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्या संशयित युवकास बोरगाव पोलिसांनी कर्नाटक राज्यातून अटक केली. अमोघसिध्द महादेव कुंभार (वय 22, रा. अहेरसंग, ता. इंडी, जि. विजापूर) यास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बोरगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन ही मुलगी लहानपणापासून तिच्या आजोळी राहते. सोमवारी सकाळी मुलीला घरी यायचे असल्यामुळे तिला आजोळहून भावाने एसटी बसमध्ये बसवून दिले. मुलीला बसमध्ये बसवून दिल्याची माहिती त्याने फोनवरून घरी दिली होती. मात्र, सायंकाळी उशीर झाला तरी मुलगी घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी परिसरात तिचा शोध घेतला. तिचा ठावठिकाणा न लागल्यामुळे मंगळवारी रात्री कुटुंबियांनी बोरगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुध्द अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता.
पोलीस तपास करत असताना ही मुलगी अचानक घरी परतली. कुटुंबियांनी मुलीस बोरगाव पोलीस ठाण्यात आणले. यावेळी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता मुलीस अमोघसिध्द कुंभार याने इंडी (कर्नाटक) येथे बोलावून घेऊन तेथील एका लॉजवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत सपोनि डॉ. सागर वाघ हे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, राहुल भोये व विशाल जाधव यांच्यासह इंडी (कर्नाटक) येथे शुक्रवारी सकाळी रवाना झाले. तेथे कर्नाटक पोलीस व सायबर सेलच्या मदतीने कर्नाटकातील नाद गावच्या शिवारात लपलेल्या संशयित अमोघसिध्द कुंभार याला अटक केली.
शनिवारी पहाटे त्याला बोरगाव येथे आणण्यात आले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सपोनि डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.