मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला. या ...
मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जात असताना मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी लगेच स्वबळाचा नारा आळवला आहे. मुंबईत काँग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे इतर सगळ्यांना विरोध राहील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. मुंबईत कॅप्टन म्हणून बदल निश्चित करुन दाखवणार असल्याचा दावाही त्यांनी केला. माझ्या साथीला अनुभवी आणि चांगली टीम दिली आहे. नाराज नेत्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
काँग्रेसचेच नेते नसीम खान यांनी मुंबई महापालिकेचा सर्व 227 जागांवर आम्ही निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. येत्या काळात काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवेल. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपकडे महापालिकेची सत्ता होती. त्यामुळे रखडलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच, असे ते म्हणाले. राज्य सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांचे प्रश्न मार्गी लागत नाही. त्यांना निधी मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळेच सोनिया गांधी यांना हस्तक्षेप करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे. मला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, असे खान म्हणाले.