मुंबईः मुंबईत ऑटो आणि टॅक्सी संघटनेनं किमान मीटर भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या या मागणीला मान्यता मिळाल्यास मुंबईकरांचे ब...
मुंबईः मुंबईत ऑटो आणि टॅक्सी संघटनेनं किमान मीटर भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या या मागणीला मान्यता मिळाल्यास मुंबईकरांचे बजेट कोलमडू शकते. संघटनेकडून रिक्षासाठी कमीत कमी दोन रुपये आणि टॅक्सीसाठी तीन रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव आहे.
गेल्या पाच वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे ऑटो आणि टॅक्सी चालकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावतो आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ऑटो आणि टॅक्सी संघटनांच्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीसाठी खटुआ समितीची शिफारस लागू करण्यात आली आहे. सरकारने या समितीच्या शिफारशी स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे भाडेवाढीसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. या शिफारशीनुसार टॅक्सीच्या आठ टप्प्यांत आणि रिक्षच्या चार टप्प्यांत भाडेवाढीचा प्रस्ताव असून, त्यात रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या अनेक मागण्यांचा समावेश आहे.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणेे म्हणाले, की रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच यासंदर्भात समिती अंतिम निर्णय घेणार आहे. सरकारने नियुक्त केलेल्या हकीम समितीच्या सूत्रांनुसार दरवर्षी जूनमध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ केली जाते. सद्यस्थितीत काळ्या-पिवळ्या रिक्षाचे किमान भाडे 18 रुपये आहे, तर टॅक्सीचे किमान भाडे 22 रुपये आहे. रिक्षाचे भाडे किमान दोन रुपयांनी आणि टॅक्सीचे भाडे किमान तीन रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे 20 रुपयांवरून वाढून 22 रुपये आणि टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरून वाढून 25 रुपये होईल.