अहमदनगर / प्रतिनिधीः काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधीयांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यावरून भाजपचे...
अहमदनगर / प्रतिनिधीः काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधीयांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यावरून भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.
विखे पाटील यांनी, सत्तेकरता काँग्रेस लाचार झाली आहे. महाविकास सरकारचा कुठलाही समान कार्यक्रम नाही. केवळ सत्तावाटपाचा कार्यक्रम सुरू असल्याचा सणसणीत टोला हाणला. या वेळी विखे म्हणाले, की राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेत्यांची दिशाभूल केली आहे. सोनिया यांच्या पत्रामुळे हे स्पष्ट झाले आहे. सत्तेकरता किती लाचारी स्वीकारावी, हे स्थानिक नेतृत्त्वाने करून दाखवल्याचे उत्तम उदाहरण असल्याची खोचक टीका विखे पाटील यांनी थोरात यांच नाव न घेता केली आहे. दरम्यान, या आधी याच मुद्द्यावर भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकादा सडकून टीका केली.
हे महाविकास आघाडीचे सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे. हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो; मात्र आता सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली आहे. आता तरी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेसाठी लाचारी नाकारून आपल्या समाज बांधवांसाठी न्याय मिळवून द्यावा, असा सल्ला पडळकर यांनी दिला आहे.
दुसरीकडे, सोनिया यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधींचे पत्र म्हणजे केवळ संवाद आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. सामान्य माणूस महाविकास आघाडीच्या केंद्रस्थानी आहे. गरीब, मागासवर्गावर सरकार जास्त लक्ष पुरवत आहे, असे थोरात यांनी सांगितले. सोनिया यांचा यासाठी सातत्याने संवाद सुरू आहे. यासाठी आता त्यांनी पत्र लिहिले आहे इतकेच. यात काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.