गीता जन्मदात्यांच्या शोधात पोहोचली परभणीत चुकून गेलेली पाकिस्तानात; नदीकाठी बालपणीच्या घराचा शोध घेणार परभणी/प्रतिनिधी ः मूकी व बहिरी असले...
गीता जन्मदात्यांच्या शोधात पोहोचली परभणीत
चुकून गेलेली पाकिस्तानात; नदीकाठी बालपणीच्या घराचा शोध घेणार
परभणी/प्रतिनिधी ः मूकी व बहिरी असलेली भारतीय मुलगी गीता पंधरा वर्षांंपूर्वी चुकून पाकिस्तानात गेली होती. आपल्या माता-पित्यांचा शोध घेत गीता सोमवारी परभणी शहरात पोहोचली. आज दुपारी सचखंड एक्सप्रेसने तिचे परभणी स्थानकावर आगमन झाले. दरम्यान, आज गीताने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली असून उद्या ती गंगाखेड येथे जाणार आहे.
तिच्या समवेत मध्यप्रदेशातील आनंद मूकबधीर सर्विस संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेंद्र पुरोहित, इंदौंर रेल्वे पोलिस दलातील कर्मचारी साधना बघेल हे आले आहेत. परभणीतील पहल फ ाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिकेत कुलकर्णी-सेलगावकर यांच्या माध्यमातून गीता परभणीत आली आहे. रेल्वेतून उतरल्यानंतर शासकीय रेल्वे पोलिस चौंकी येथे पोलिस उपनिरीक्षक जे.एस.लांडगे यांनी त्यांचे स्वागत केले. लाल-काळी सलवार कमीझ व दुपट्टयाने झाकलेले डोके व तोंडाला मास्क अशा वेशात गीता आली. गीता पंधरा वर्षांंपूर्वी चुकून पाकिस्तानात गेली होती. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने कराचीहून ती 2015 साली भारतात परतली. पाकिस्तानात एधी फाउंडेशनने तिचा सांभाळ केला. गीता भारतातून पाकिस्तानात गेली तेव्हा 7-8 वर्षांची होती व पंधरा वर्षांपूर्वी ती पाकिस्तानी रेंजर्सला सापडली होती. नंतर तिला एधी फाउंडेशनने दत्तक घेतले व नंतर ती कराचीत रहात होती. 2015 साली बिलकीस व त्यांचे नातू सबा व साद एधी तिच्यासमवेत भारतात आले होते. सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटामुळे गीताची ही कहाणी पुढे आली होती. दरम्यान, भारतातील काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गीता आपल्या जन्मदात्यांचा शोध घेत विविध राज्यांत जावून आली. पण तिचा शोध थांबलेला नाही. मुकी व बहिरी असल्याने संभाषणात अनेक अडथळे येत आहेत.
पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या दौर्यावर आहे. ती सोमवारी परभणीत दाखल झाली. परभणी रेल्वे स्थानकासह पूर्णा आणि गंगाखेड रेल्वेस्थानक आणि शहरात फिरून ती तिच्या कुटुंबाचा शोध घेणार असल्याची माहिती इंदोर येथील आनंद सेवा सोसायटीच्या ग्यानेंन्द्र पुरोहित यांनी दिली.
गीताचा सांभाळ करणार्या इंदोर येथील आनंद सेवा सोसायटीच्या म्हणण्यानुसार, तिने तिच्या घराजवळ रेल्वे स्थानक असून परिसरात ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असल्याचे सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील अशा दृश्यांची सर्व ठिकाणे गीताला दाखविण्यात येत आहेत. त्यानुसार परभणी शहरातील तसेच गंगाखेड आणि पूर्णा येथे रेल्वे स्थानकदेखील तिला दाखवून या गावांमध्ये तिला फिरवून तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गीताच्या नाकाला उजवीकडे छिद्र आहे. त्यानुसार तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि भुईमुगाचे पीक घेतले जात असावीत. दरम्यान, गीता ही तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची प्रशंसक आहे. गीताच्या हावभावानुसार तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात. तसेच लहानपणीच्या पुसट आठवणींद्वारे गीताने आपल्या गावाजवळ एक रेल्वे स्थानक आणि गावातील नदीच्या किनार्यावर एक मंदिर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार सुरुवातीला गीताला नांदेड आणि जालना जिल्ह्यातील रेल्वे स्थानक असणार्या परिसरात नेले होते. यानंतर तेलंगाणाच्या सीमाभागात गीताच्या कुटुंबाचा शोध घेतला होता.