अहमदनगर / प्रतिनिधी: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील महत्वाच्या साक्षीद...
अहमदनगर / प्रतिनिधी: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदार बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. जरे यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याच्या हालचाली सुरू आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने याबाबत माहिती दिली. दरम्यान, नगरसह विविध ठिकाणी बोठेचा शोध घेण्यात येत आहे.
जरे हत्या प्रकरणात पाच आरोपी अटकेत आहेत. मुख्य सूत्रधार, सकाळचा माजी कार्यकारी संपादक, बाळ ज. बोठे पसार आहे. जरे यांची हत्या करण्यासाठी धारदार चाकू वापरण्यात आला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही घटना घडली, तेव्हा माने या जरे यांच्यासोबत कारमध्ये होत्या. या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार असणार्या माने यांनी भीती वाटत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे अर्जाद्वारे पोलिस संरक्षण मागितले होते. सोमवारी माने यांनी पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यानंतर आज, मंगळवारी माने यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. जरे यांचा मुलगा रुणाल जरे यानेही आरोपी बोठे याच्याकडून आमच्या कुटुंबाला धोका असल्याचे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. जरे यांच्या कुटुंबीयांनीही पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. या निवेदनाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून, पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
जरे हत्या प्रकरणातील पाच आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांच्या तपासात चांगलीच प्रगती होत असून, आता बोठे याला पकडल्यानंतरच हत्येचे नेमके कारण समोर येणार आहे. त्यामुळे पोलिसांकडून आरोपी बोठे याचा शोध घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. पोलिसांनी पाच पथके नगरसह विविध जिल्ह्यांत बोठेचा शोध घेत आहेत.