कोरोना हळूहळू कमी होत असला तरी काळजी घ्या बीड । प्रतिनिधीः- कोरोनाने हाहाकार माजवून सोडलेल्या बीड जिल्ह्यात आता कोरोना हळूहळू हद्दपार होताना...
कोरोना हळूहळू कमी होत असला तरी काळजी घ्या
बीड । प्रतिनिधीः-
कोरोनाने हाहाकार माजवून सोडलेल्या बीड जिल्ह्यात आता कोरोना हळूहळू हद्दपार होताना दिसून येत असून आज प्राप्त झालेल्या 439 अहवालापैकी पाच तालुक्यात केवळ 22 कोरोना बाधीत आढळून आले असून पाटोदा, शिरूर, माजलगाव, गेवराई, परळी, धारूर या सहा तालुक्यात आज एकही रुग्ण आढळून आला नाही. ही आनंदाची बातमी समोर येत आहे.
मात्र असे असले तरी कोरोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने दिलेल्या प्रत्येक सुचनेचे पालन जनतेने करावे, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 16 हजार 40 रुग्ण बाधीत आढळून आले आहेत. त्यापैकी 15 हजार 104, जणांची सुट्टी झाली तर 527 जण कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्युमुखी पडले आहेत. आज मितीला रुग्णालयात 409 बाधीत उपचार घेत आहेत. यापैकी 50 जणांची आज सुट्टी होणार आहे.
गेल्या सात महिन्यांपासून बीड जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवून सोडला. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या सजग कार्यप्रणालीमुळे कोरोनाला अनेक ठिकाणी रोखता आले तरीही जिल्ह्याचा कोरोना बाधीतांचा आकडा तब्बल 16 हजार 40 वर जावून पोहचला तर बरे होण्याचा दरही चांगला राहिला. आतापर्यंत 15 हजार 104 कोरोना बाधीत बरे होऊन घरी गेले. दुर्दैवाने या सात महिन्यात 527 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या रुग्णालयामध्ये एकूण 409 कोरोनाबाधीत उपचार घते असून आज 50 जणांची सुट्टी केली जाणार आहे. दुसरीकडे कोरोना जिल्ह्यातून हळूहळू हद्दपार होत असल्याचे चित्र समोर येत असून आज प्राप्त झोल्या 439 अहवालांपैकी केवळ 22 जण बाधीत आढळले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 6, आष्टी 6, बीड 8, केज 1, वडवणी 1 तर पाटोदा, शिरूर, माजलगाव, परळी, धारूर, गेवराई या तालुक्यात आज एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला नाही. कोरोना हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसून येत असले तरी कोरोनाचे कायम उच्चाटन करण्यासाठी जनतेने आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.