श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांची माहिती नागपूर : अयोध्येत प्रस्तावित असलेले प्रभू रामचंद्राचे मंदिर उभारण्...
श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांची माहिती
नागपूर : अयोध्येत प्रस्तावित असलेले प्रभू रामचंद्राचे मंदिर उभारण्यासाठी सुमारे 400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे मंदिर आगामी साडेतीन वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी सोमवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले की, आगामी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान भव्य राममंदिराकरिता निधी समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे.
यात 10 रुपयापासून 100 आणि 1000 रुपयांपर्यंत राशी देणगीच्या रूपात कूपनच्या माध्यमातून संग्रहित करण्यात येणार आहे. संपूर्ण मंदिरावर 1100 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मंदिराचा पायवा दगडाने रचण्यात येणार असून मंदिराचे बांधकाम तीन स्तरावर होणार आहे. या मंदिराकरिता राज्यस्थान येथील बन्सीपहाड येथून दगड मागविण्यात आले आहे. मंदिर निर्माणाकरिता यापूर्वी जो निधी गोळा करण्यात आला होता त्यापैकी सहा कोटी रुपये न्यासाकडे जमा करण्यात आल्याची माहिती गोविंदगिरी महाराज यांनी दिली. त्यावेळी जमा करण्यात आलेल्या विटांचा वापर मंदिरात करण्यात येणार नसून त्याचा अन्य ठिकाणी वापर करण्यात येईल. मंदिर परिसर क्षेत्रात भव्य डिजिटल ग्रंथालय सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रारंभी पायवा न खोदताच राम मंदिर बांधकाम करण्याचे ठरवण्यात आले होते. समितीत आपला प्रवेश झाल्यानंतर पायवा खोदूनच बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई, सुरत, रूडकी, गुवाहाटी, दिल्ली आदी देशभरातील आयआयटीमधील आठ जणांच्या तज्ज्ञ समितीने पायव्याचे दोन आराखडे तयार केले आहे. यासंदर्भात मंगळवार, 29 रोजी दिल्ली येथे होणार्या बैठकीत दोनपैकी एक आराखडा अंतिम करण्यात येईल, अशी माहिती गोविंददेव गिरी यांनी दिली. यावेळी गोविंददेवगिरी यांना कृषी आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शेतकरी सहभागी नसून हे आंदोलन टुकडे टुकडे गँगने ताब्यात घेतले आहे. देशविघातक शक्तींनी आंदोलनात शिरकाव केल्याने ते भरकटले आहे, अशी टीका महाराजांनी केली.
लोकसहभागासाठी निधी संकलन
अयोध्येतील राम मंदिर बांधकामासाठी अनेक औद्योगिक घराणी समोर आली होती. एका औद्योगिक घराण्याने एकट्यानेच मंदिर बांधण्याची तयारी दर्शवली होती. परंतु राम मंदिर उभारणीत प्रत्येकाचा खारीचा का होईना वाटा असावा म्हणून कुपनद्वारे निधी संकलन मोहीम सुरू करण्यात आली. 15 फेब्रुवारीनंतर पावती पुस्तकाद्वारे निधी संकलन मोहीम सुरूच राहिल, असे महाराजांनी सांगितले. तीनेक वर्षांपूर्वी राम मंदिरासाठी करण्यात आलेल्या निधी संकलनातून जमा झालेले 6 कोटी रूपये रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासात जमा झाले आहे.