महाबळेश्वर / प्रतिनिधी : सातारा विभागात उत्पन्नात व भारमानात आघाडीवर असलेल्या महाबळेश्वर आगारात गेल्या आठ दिवसांपासून डिझेलचा तुटवडा असल्यान...
महाबळेश्वर / प्रतिनिधी : सातारा विभागात उत्पन्नात व भारमानात आघाडीवर असलेल्या महाबळेश्वर आगारात गेल्या आठ दिवसांपासून डिझेलचा तुटवडा असल्याने प्रवासी, कामगारांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. इतर आगारांतही पुरेसे डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे आगाराचे वेळापत्रक पुरते बिघडले आहे.
महाबळेश्वर आगारातील डिझेल गेल्या आठ दिवसांपासून पूर्ण संपले आहे. त्यामुळे आगाराला डिझेलसाठी इतर आगारांवर अवलंबून राहावे लागत आहे. डिझेल नसल्याने इतर आगारांत इंधन भरण्यासाठी गाडी जात असल्यामुळे वेळापत्रक विस्कळित होत आहे. मुंबईला जाताना तीन ते चार आगारांत बस इंधन भरण्यासाठी न्यावी लागते. यामुळे अंदाजे तासभर गाडी उशिरा धावते. याचा फटका प्रवाशांना बसतो आहे. वास्तविक महाबळेश्वर आगार उत्पन्न व भारमानात सातारा विभागात आघाडीवर असताना आगाराला इंधन वेळेवर का उपलब्ध होत नाही? याबाबत वरिष्ठ कार्यालयाने दखल घेणे आवश्यक आहे.
महाबळेश्र्वर हे जगातील प्रसिध्द असे पर्यटन स्थळ असल्याने येथे पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्या चांगल्या उत्पन्न आणतात. तरीही महाबळेश्वर आगारात इंधनाअभावी गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. डिझेल नसल्याने गाड्या उशिरा धावू लागल्या आहेत. महाबळेश्वर तालुका दुर्गम व डोंगराळ असल्याने घाटरस्त्याने गाड्या धीम्या गतीने धावतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. महाबळेश्वर आगारातील ग्रामीण मुक्कामी गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी महाबळेश्वर आगाराचा इंधन पुरवठा तातडीने पूर्ववत करावा, तसेच ग्रामीण मुक्काम तातडीने सुरू करावेत, अशी मागणी तालुक्यातील नागरिक व प्रवासी करत आहेत.
....