कर्जत/प्रतिनिधी ः तलवार व टाटा सफारी वाहन यासह कर्जत पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोल...
कर्जत/प्रतिनिधी ःतलवार व टाटा सफारी वाहन यासह कर्जत पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळसीदास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे यांनी ही कारवाई केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने कर्जत तालुक्यात पोलीस गस्त करीत असताना दि.18 रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास बारडगाव-राशीन रस्त्यावर पोलीस पथक असताना मागून टाटा सफारी वाहन (एम. एच.12, जी.के. 3771) भरधाव वेगाने राशीनच्या दिशेने जाताना त्यांना दिसले. संशय वाटल्याने पोलिसांनी धुमकाई फाटा या ठिकाणी सफारी वाहन अडविले. त्यात फक्त वाहन चालवणारा इसम होता. त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने आपले नाव उमेश भाऊसाहेब म्हस्के वय-37 वर्ष रा. तळवडी ता. कर्जत असे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी गाडीची झडती घेतली. त्या गाडीच्या बाकावर पोलिसांना एक लोखंडी तलवार मिळून आल्याने पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले. कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.