कोरोना विषाणूची निर्मिती चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेत करण्यात आल्याचा जगाचा संशय आहे. त्यामुळे जगाने चीनवर बहिष्कार घातला असला, तरी त्याचा ...
कोरोना विषाणूची निर्मिती चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेत करण्यात आल्याचा जगाचा संशय आहे. त्यामुळे जगाने चीनवर बहिष्कार घातला असला, तरी त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झाला नाही. जगाची अर्थव्यवस्था मंद झाली. विकासदर घटला. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. भारताचा आर्थिक विकासदर उणे झाला. असे असताना चीनचा विकासदर सुरुवातीला घटला असला, तरी त्यातून तो सावरला आहे. जागतिक नाणेनिधीच्या एका अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेत गेल्या ऐंशी वर्षांतील सर्वांत मोठी घसरण झाली आहे. अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात आकुंचन झाले. गरिबीचे प्रमाण वाढले. ज्या चीनमध्ये कोरोनाचा विषाणू सर्वांत अगोदर आढळला, त्याच चीनने कोरोनावर सर्वांत यशस्वी मात केली. आरोग्य व्यवस्था पूर्वपदावर आणली. कोरोना संकटामुळे व्यापार कमी झाला आणि नोकर्या कमी झाल्यामुळे असमानतेची परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक वाढेल, असे भाकीत करण्यात आले. दुसरीकडे जागतिक नाणेनिधीच्या आकडेवारीचा हवाला देत ब्लूमबर्गने असे म्हटले आहे, की चीनचे वुहान शहर आपले आर्थिक आरोग्य बळकट करणार आहे. एवढेच नव्हे तर येत्या काही वर्षांत चीन अमेरिकेला आर्थिक विकासाच्या बाबतीत मागे टाकील आणि जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न चीन प्रत्यक्षात आणण्याची शक्यता आहे. कोरोनानंतर भलेही अमेरिकेने 32 टक्के विकासदर गाठल्याचे सांगितले जात असले, तरी त्याची वस्तुस्थिती स्पष्ट व्हायची आहे. ब्लूमबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे, की कोरोना महामारी जागतिक विकासामध्ये कायमस्वरूपी बदल घडवून आणेल. उर्वरित जगाची परिस्थिती काहीही असो, चीन वाढीच्या बाबतीत पुढे जाईल. चीनमधील जगातील वाढीचे प्रमाण 2021 मधील 26.8 टक्क्यांवरून 2025 मध्ये 27.7 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. ब्लूमबर्गचा अहवाल सूचित करतो, की आगामी काळात अमेरिकेला गंभीर आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आकडेवारीनुसार चीनचा विकास दर अमेरिकेपेक्षा 15 आणि 17 टक्के जास्त आहे. भारत, जर्मनी आणि इंडोनेशियाच्या आकडेवारीला दिलासा मिळाला आहे. अहवालानुसार, भारत, जर्मनी आणि इंडोनेशियाच्या अर्थव्यवस्था पुढील वर्षी पहिल्या पाच सवार्ंत मोठ्या ग्रोथ इंजिन आहेत. जागतिक नाणेनिधीच्या अंदाजानुसार, पुढच्या वर्षी चीनची अर्थव्यवस्था 8.2 टक्क्यांनी, तर अमेरिकेची वाढ 3.1 टक्क्यांची असेल. याचा जगात सर्वाधिक वाढीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून चीन पाच वर्षांनंतर आपले स्थान पुन्हा मिळवील. 2021 मध्ये क्रयशक्तीच्या बाबतीत जागतिक वाढीच्या 11.6 टक्के असेल. दोन दशकांत प्रथमच गरीबी वेगाने वाढत आहे. तो जीवनमानासाठी मोठा धक्का आहे; मात्र चीनच्या बाबतीत उलटे घडते आहे. तेथील गरीबी कमी होत आहे. जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली असली तरी अनिश्चितता निर्माण होईल. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या पाच देशांमध्ये जीडीपी कमी होण्याचा अंदाज आहे. अमेरिका, ब्राझील, भारत, मेक्सिको आणि ब्रिटनमध्ये सुमारे 1.8 ट्रिलियन डॉलर्सने अर्थव्यवस्था कमी होईल. गरीब आणि गरीब दिवसेंदिवस गरीब होत असून यंदा सुमारे नऊ कोटी लोक गरीब असल्याचा अंदाज आहे. जानेवारीत कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी, जागतिक नाणेनिधीने या वर्षी 3.3 टक्के आणि 2021 मध्ये 3.4 टक्के जागतिक वाढीचा अंदाज वर्तविला होता.
जगभरातील शेकडो देशांमधील आर्थिक गणिते कोरोनाच्या साथीमुळे कोलमडली आहेत; मात्र त्याचवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या देशामधून सुरू झाला, त्या चीनच्या निर्यातीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर चीनविरोधात मोहीम सुरू केली होती. चिनी मालावर बंदी घालण्याच्या मागण्यांपासून ते अगदी चिनी कंपन्यांवर कठोर निर्बंध लागू करण्यापर्यंत अनेक गोष्टी ट्रम्प प्रशासनाने केल्या; मात्र चीन आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापारामध्ये मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दोन्ही देशामध्ये 75.4 अब्ज डॉलरचा वाढीव व्यापार झाला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये चीनची एकूण निर्यात 268 अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चीनमधून झालेली निर्यात ही 21.1 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळेच कोरोनाचा संकटाच्या काळात चीनने मागील वर्षीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करत वाढीव व्यापार केल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील ग्राहकांकडून चिनी वस्तूंना चांगली मागणी असल्याने निर्यात वाढल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेने चीनच्या वस्तूंना बंदी घातली असतानाही अमेरिकेत चिनी वस्तूंची आयात मोठ्या प्रमाणात वाढली. बहिष्काराचे अस्त्रही तिथे निष्प्रभ झाली आहे. जकात विभागाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये निर्यात केल्या जाणार्या चिनी वस्तूंची टक्केवारी 46 टक्क्यांनी वाढली आहे. दरांवरून अमेरिका आणि चीनमध्ये मागील काही महिन्यांपासून व्यापारी युद्ध सुरू होते. असे असतानाही ही वाढ आश्चर्यकारक आहे.
ऑक्टोबरमध्ये चीनमधून होणारी निर्यात 11.4 टक्क्यांनी वाढली होती, तर चीनमधील आयातही पाच टक्क्यांनी वाढून 192.6 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचली होती. ऑक्टोबर महिन्यात चीनची आयात 4.7 टक्क्यांनी वाढली. या आकड्यांवरुन चीनची असर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटामधून पूर्णपणे सावरल्याचे स्पष्ट होत आहे.
संपूर्ण जगाला मृत्यूच्या खाईत लोटणार्या चीनने आता विकासाची वाट धरली आहे. सहा महिन्यांपूर्वी निर्माण झालेल्या कोरोना संकटातून चीन सावरला असून दुसर्या तिमाहीत चिनी अर्थव्यवस्थेचा विकासदर 3.2 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
एप्रिल ते जून या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर करण्यात आली. ज्यात चिनी अर्थव्यवस्थेचा विकासदर 3.2 टक्के झाला आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे संकेत आहेत. वुहानमध्ये बरोबर एका वर्षापूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळले. जानेवारीपासून यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे चीनला टाळेबंदी जाहीर करावी लागली. या काळात चीनचा विकासदर दशकभराच्या नीचांकापर्यंत खाली आला. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चीनचा विकासदर 1.6 टक्के झाला. गेली काही वर्षे चीनचा विकासदर सहा ते साडेसात टक्क्यांच्या दरम्यानच राहिला. कोरोनाच्या पहिल्या तीन महिन्यांच्या काळात चीनचे मोठे नुकसान झाले. विकासदर 6.8 टक्क्यांनी घसरला; परंतु कोरोनाचा फैलाव कमी झाला आणि चिनी सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपयायोजना सुरु केल्या. चीनमधून कोरोनाचा इतर देशांत झपाट्याने प्रसार केला. आशियातील इतर देशांमध्ये चीननंतर कोरोना मोठ्या संख्येने पसरला. आतापर्यंत चार कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाचे मूळ शोधण्याच्या कामात जग लागले असताना एका वर्षांतही चीनविरोधातील आरोपाचे मूळ शोधता आले नाही. जगाने भलेही कितीही बहिष्कार टाकला, तरी चीनने आता जगात असे स्थान निर्माण केले आहे, की कोणताही देश चीनपासून अलिप्त राहू शकत नाही. व्यापारी बहिष्काराचे अस्त्र निरोपयोगी ठरते आहे. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था, उद्योग चिनी आयातीवर अवलंबून असतात. त्याचा प्रत्यय आला असून चीनची निर्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे, हे नक्कीच चीनचे यश आहे. पुढच्या वर्षी तर तिने नक्कीच आणखी झेप घेतलेली असेल. जगाने त्यापासून धडा घेतला पाहिजे. चीनने कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय आर्थिक उपाय केले, हे समजून जगानेही तसेच उपाय करायला हवेत.