शेतकर्याच्या नुकसानीची आकडेवारी 24 तासात देण्याच्या अधिकार्यांना केले सुचना बीड । प्रतिनिधीः काल परळीत सात तासाचा महा दरबार घेतल्यानंतर रा...
शेतकर्याच्या नुकसानीची आकडेवारी 24 तासात देण्याच्या अधिकार्यांना केले सुचना
बीड । प्रतिनिधीः
काल परळीत सात तासाचा महा दरबार घेतल्यानंतर राज्याचे सामाजीक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडेंनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात मॅराथॉन बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. बैठकीच्या सुरुवातीलाच कृषी विभागाचा आढावा घेत 24 तासात तालुकानिहाय पिक पहाणी आणि नुकसान भरपाईची आकडेवारी मिळाली पाहिजे, तूर आणि अन्य पिकांचे बियाणे उगवले नव्हते. त्यातील प्राप्त तक्रारी 31 डिसेंबरपर्यंत निकाली काढा, प्रलंबीत कर्ज प्रकरणे निकाली निघले पाहिजेत, शेतकर्यांच्या कर्ज वाटपात केलेलं राजकारण खपवून घेणार नाही, म्हणत धनंजय मुंडेंनी कृषी विभागाची झाडाझडती घेतली. सदरची बैठक संपल्यानंतर एम.एस.ई.बी. मधील अधिकारी, कर्मचार्यांची बैठक घेऊन ट्रान्सफार्मरसह आयपीडीएस योजनेतील प्रलंबीत कामे अधिकार्यांनी उभे राहून पूर्ण करून घ्यावेत, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होत नसेल तर ती आपण मिळवून देऊ, असे म्हणत ना. मुंडेंनी मॅराथॉन बैठका सुरू ठेवल्या असून वर्षभरात पालकमंत्री धनंजय मुंडेंनी आतापर्यंत पंधरापेक्षा अधिक बैठका घेऊन पालकमंत्री कसा असतो हे दाखवून दिले आहे.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आपल्या कामात अग्रेसर असून कामाचा आढावा घेणे, मग तो आपल्या खात्याचा असो अथवा बीड जिल्ह्याचे पालक म्हणून जिल्ह्याचा असो, बैठका घेणे, अधिकार्यांना सूचना देणे, काम करून घेणे आणि लोकांचे प्रश्न सोडवणे हे ध्येय धनंजय मुंडेंचे दिसून येते. सत्तेत असताना जनतेत राहणारा आणि जनतेचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहितले जात असून काल सात तासाचा परळीत जनता दरबार भरवून सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ निकाली काढल्यानंतर आज ना. मुंडेंनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांकडून आढावा घेण्यास सुरुवात केली. सकाळी साडेअकरा वाजता बैठकीला सुरुवात झाली. या वेळी कृषी विभागाचा आढावा धनंजय मुंडेंनी घेतला. हा आढावा घेताना कामचुकार अधिकार्यांना चांगलेच झापले तर ज्यांनी चांगले काम केले आहे त्यांचे कौतुकही केले. कृषी विभागाने केलेले नुकसानीचे पंचनामे, अतिवृष्टी नुकसान भरपाईची आकडेवारी 24 तासांच्या आत तालुका व पिकनिहाय मिळाली पाहिजे, अशी तंबी देत बोगस बियाणेंबाबतच्या तक्रारींवर केलेली कारवाई समाधानकारक नसल्याचे सांगून 15 कंपन्यांवर गुन्हे दाखल केले. पण फक्त सोयाबीन बियाणे उगवले नाही हा युक्तीवाद चुकीचा असल्याचे सांगून तूर आणि अन्य पिकांचेही बियाणेही उगवले नव्हते त्यामुळे शेतकर्यांच्या प्राप्त तक्रारी 31 डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याचे आदेश या वेळी धनंजय मुंडेंनी दिले. डीसीसी बँक बरखास्त झालेल्या सोसायटीच्या शिफारशींआधारे कर्जवाटप केलेल्या तक्रारी त्यांच्यावर डीडीआर व लिड बँक मॅनेजर यांनी सात दिवसात कारवाई करावी, शेतकर्यांच्या कर्जवाटपात केलेलं राजकारण खपवून घेणार नाही, असा दमही धनंजय मुंडेंनी या आढावा बैठकीत देऊन शेतकर्यांना कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाहीत, असे काम करण्याच्या सूचना दिल्या. यापाठोपाठ तात्काळ एमएसईबीच्या अधिकारी, कर्मचार्यांची बैठक सुरू करून सुरुवातीलाच धनंजय मुंडेंनी रिक्त पदांची तालुकानिहाय यादी अधिकार्यांकडून मागीतली. त्याचबरोबर 762 ट्रान्सफार्मर ओव्हरलोड आहेत, त्यांना बदलण्यासाठी लोड अपग्रेडेशन करण्यासाठी एकूण 37.5 कोटींचा निधी आवश्यक आहे, डीपीडीसीमधून 4 कोटीच्या निधीला मंजुरी देऊ, उर्वरित मागणी द्या, जि.प. स्पेशल कंपोंटमधून निधी उपलब्ध करून देऊ, असं सांगून आयपीडीएस योजनेतील प्रलंबीत कामे अधिकार्यांनी उभे राहून पूर्ण करून घ्यावेत, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचे 21 प्रकल्प मंजूर आहेत, आठ उपकेंद्र कार्यरत असून चारची कामे कामे सुरू आहेत. उर्वरित कुठल्याही प्रकल्पाला जागा उपलब्ध होत नसेल तर आम्ही जागा उपलब्ध करून देऊ, असे सांगून सौर ऊर्जा नैसर्गिक आहे त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ कसा घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही धनंजय मुंडेंनी सांगितले. जिल्ह्यातील विविध खात्यांचा आढावा आज धनंजय मुंडे घेत असून महावितरण विभागाचा आढावा घेतल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ विभागाचा आढावा यानंतर घेण्यात येणार आहे. जलजीवन मिशन कार्यक्रम प्रगती आढावा, आधारभूत खरेदी केंद्र चालू करण्याबाबत बीड नगर परिषद विविध योजना व विकास कामांचा आढावा, पंतप्रधान मत्स्यविकास योजना आढावा या बैठकीत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. धनंजय मुंडेंच्या आज मॅराथॉन बैठका होत असून जिल्ह्यातील सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाला कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाहीत, विकास कामे तात्काळ मार्गी लागतील याबाबतच्या सूचना मुंडेंकडून अधिकार्यांना दिल्या जात आहेत. या बैठकीला आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, जि.प. अध्यक्षा सिरसाट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सीईओ अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, सामान्य प्रशासन विभागाचे प्रकाश आघाव यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.