मुंबई / प्रतिनिधी: देशांतर्गत सकारात्मक वातावरण आणि जागतिक पातळीवरील संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. देशातील दोन्ही निर्दे...
मुंबई / प्रतिनिधी: देशांतर्गत सकारात्मक वातावरण आणि जागतिक पातळीवरील संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. देशातील दोन्ही निर्देशांक आज (बुधवार) तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 0.28 टक्के म्हणजेच 133.14 अंकांच्या वाढीसह 47 हजार 746 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 49. 35 अंकांच्या तेजीसह 13 हजार 981 अंकांवर बंद झाला.
गेल्या सहा दिवसांपासून शेअर बाजार तेजीत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 2020 मध्ये झालेले नुकसान वर्षाखेरीस भरून येऊ शकते, असा कयास बांधला जात आहे; मात्र आगामी काळात शेअर बाजारात काही चढ-उतार दिसून येऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. एक जानेवारी 2020 रोजी शेअर बाजाराचा निर्देशांक 41 हजार 306 अंकांवर बंद झाला होता. शेअर बाजारात आज दिवसभर अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम, श्री सिमेंट, बजाज फायनान्स आणि आयशर मोटर्स या कंपन्यांच्या समभागात तेजी दिसून आली. तर, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, सन फार्मा, एसबीआय आणि भारती एअरटेल या कंपन्यांचे समभाग कोसळल्याचे पाहायला मिळाले. सेक्टरनुसार आढावा घेतल्यास बँका, फार्मा यांसह अनेक सेक्टर्स वाढीसह बंद झाले. फायनान्स, सर्व्हिसेस, आयटी, मीडिया, ऑटो आणि मेटल सेक्टरमधील शेअर घसरल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी शेअर बाजार वाढीसह खुला झाला. सकाळच्या सत्रात शेअर बाजार 38. 72 अंक, तर निफ्टी 11.10 अंकांच्या वाढीसह खुला झाला होता.