नाशिकरोड, प्रतिनिधी एचडीएफसीच्या विम्याचे पैसे परत मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत येथील एकाला ६ लाख १० हजारांना गंडा घालण्यात आला. फसवणूक ...
नाशिकरोड, प्रतिनिधी
एचडीएफसीच्या विम्याचे पैसे परत मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत येथील एकाला ६ लाख १० हजारांना गंडा घालण्यात आला.
फसवणूक झालेले संदीप गजानन तितरे (३४, गुरुधारा सोसायटी, शाहूनगर, नाशिकरोड) यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा - सन २०11 मध्ये तितरे यांनी परिचित एजंट कविता खराडे यांच्यामार्फत एचडीएफसीची विमा पॉलिसी (१४७६२९५६) काढली. तिचा वार्षिक हप्ता २४ हजार रुपये होता. तीन वर्षे हप्ता भरल्यानंतर तितरे यांनी आर्थिक परिस्थिती ढासळल्याने पुढील हप्ते भरले नाहीत. फेब्रुवारी २०२० मध्ये नीरज मेहता या व्यक्तीने तितरे यांना फोन केला व तुमची एचडीएफसीच्या बंद पॉलिसीची जमा रक्कम काढण्यासाठी नवीन डमी पॉलिसी काढावी लागेल असे सांगितले. तितरे यांनी ५० हजार रुपये मेहताने दिलेल्या लिंकवर पाठविले. १० मे २०२० रोजी अशोक महाजन याने तितरेंना फोन केला. आपण आयजीएमएस आयआरडीएमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, तुम्ही एचडीएफसीची दुसरी पॉलिसी (२२३१७५२४) काढली होती. तुम्हाला तिचे ६ लाख ५५ हजार रुपये मिळणार आहेत. तुम्हाला एनओसीसाठी ४५ हजार भरावे लागतील. तितरे यांनी शंका विचारल्यावर महाजनने व्हाटसअपवर इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट या टायटलचे नेहा जैन यांच्या सहीचे पत्र पाठविले. त्यामुळे तितरेंनी ४५ हजार रुपये दिल्लीतील आयडीबीआयच्या खात्यावर १६ मे २०२० रोजी जमा केले. जून २० मध्ये रोहन या व्यक्तीने तितरे यांना फोन केला. तो म्हणाला की, तुमची पॉलिसीची फाईल माझ्याकडे आली असून तिची रक्कम मिळण्यासाठी तुम्हाला आयडीबीआय बॅँक खात्यावर प्रोसेसिंग फी भरावी लागेल. तितरे यांनी १ लाख ५८, ५०० रुपये आपल्या स्टेट बॅंकेतील खात्यावरुन आयडबीआयमध्ये जमा केले. जुलै २० मध्ये प्रिया शर्माने तितरे यांना फोन केला. ती म्हणाला की, तुमची एचडीएफसी पॉलिसीची फाईल रोहनकडून माझ्याकडे आली असून त्यात रोहनने खूप चुका केल्या आहेत. तुमची फाईल गोल्ड क्रायट्रियात टाकली आहे. तुम्हाला पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी युनियन बॅँक खात्यावर २ लाख ४५ हजार रुपये भरावे लागतील. तितरे यांनी तेवढी रक्कम आपल्या वडिलांच्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यावरुन जमा केले. ऑगस्ट २० मध्ये प्रतिभा शर्माने सुभाष या व्यक्तीच्या दोन मोबाईल नंबरवरुन तितरेंशी संपर्क साधला. प्रतिभाने सांगितले की, तुमच्या पॉलिसी सेटलमेंटची फाईल आरबीआयकडून दोन वेळा रिजेक्ट झाली आहे. तुम्ही आरबीआयची १ लाख ६२ हजाराची फी इक्विटी फायनान्सच्या खात्यात जमा करा. पुरावा म्हणून तीने आरबीआयचे पत्र पाठवले. तितरे यांनी आपल्या स्टेट बॅँकेच्या खात्यावरुन तेवढे पैसे जमा केले. नंतर तितरे यांनी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात जाऊन वरील व्यक्तींविरुध्द तक्रार अर्ज दिला होता. उपनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अशोक महाजन, रोहन (पूर्ण नाव माहित नाही), प्रिया शर्मा, प्रतिभा शर्मा, सुभाष (पूर्ण नाव माहित नाही) अशी संशयितांची नावे आहेत.